scorecardresearch

राज्य जैवविविधता मंडळाकडून स्थानिक वाण जपण्याचा प्रयत्न

निक वाण जपण्याच्या दृष्टीने राज्य जैवविविधता मंडळाने पावले उचलली असून त्यासाठी जुन्या जैवविविधतेविषयी माहिती गोळा केली जात आहे.

मंडळाचे अध्यक्ष शेषराव पाटील यांची माहिती; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूर : स्थानिक वाण जपण्याच्या दृष्टीने राज्य जैवविविधता मंडळाने पावले उचलली असून त्यासाठी जुन्या जैवविविधतेविषयी माहिती गोळा केली जात आहे. जुने आणि स्थानिक वाण जपणाऱ्या लोकांच्या भेटी घेऊन त्यांची मदत या कामात घेण्यात येत आहे, अशी माहिती राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष शेषराव पाटील यांनी दिली. लोकसत्ताला दिलेल्या सदिच्छा भेटीत ते बोलत होते.

पाटील म्हणाले, स्थानिक वाण जपण्यासाठी जो काही थोडाफार प्रयत्न आतापर्यंत झाला तो पुरेसा नाही. जुने वाण अतिशय महत्त्वाचे आहे. तुलनेने नवीन वाणाचा काहीही उपयोग नाही. राज्यातील ८० टक्के जैवविविधता बाहेर असून केवळ २० टक्के जंगलात आहे आणि या बाहेर असणाऱ्या जैवविविधतेचे संवर्धन अतिशय महत्त्वाचे आहे. त्या संवर्धनासाठी मंडळाने पावले उचलली आहेत. जैवविविधता व्यवस्थापन समितीद्वारे लोकजैवविविधता नोंदवह्या तयार करण्यात आल्या आहेत. या नोंदवह्या नसतील तर नष्ट होणाऱ्या जैवविविधतेसाठी भांडता येत नाही. गावाला त्याचा फायदा मिळणार नाही. मात्र, नोंद असेल तर भांडताही येईल आणि गावालाही त्याचा फायदा होईल. त्याचे उदाहरण म्हणजे आतापर्यंत जैविक संसाधनाच्या व्यावसायिक वापरातून महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाला एक कोटी १९ लाख ३३ हजार लाभांश रक्कम प्राप्त झाली आहे.

जिल्हा, तालुकास्तरावर जैवविविधता उद्यान हवे

जैवविविधता संवर्धनाचे महत्त्व येणाऱ्या पिढीला सांगायचे असेल तर जैवविविधता उद्यानासारखा दुसरा मार्ग नाही. त्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर जैवविविधता उद्यान तयार करण्याची गरज आहे. उद्यान म्हटले तर फक्त त्याकडे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते, त्याच पद्धतीने ते तयार केले जाते. मात्र, मंडळाच्या संकेल्पनेतील जैवविविधता उद्यान मनोरंजन नाही तर शिक्षणावर भर देणारे असेल.

देवराईंचे दस्तऐवजीकरण

सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी भटकी जीवनशैली सोडून मानव जेव्हा शेती करू लागला; त्या वेळी जंगलतोड जास्त प्रमाणात होऊ लागल्यामुळे वस्ती व गावाजवळील जंगलाचा काही भाग राखून ठेवण्यात आला. या भागालाच लोक श्रद्धेने देवराई संबोधू लागले. लोकांनी देवावरच्या श्रद्धेने, देवाचा कोप होण्याच्या भीतीने या जंगल क्षेत्रांना संपूर्ण संरक्षण दिले. त्यामुळे शेकडो वर्षे हे जंगलांचे तुकडे संरक्षित राहून निसर्ग संरक्षण साधले गेले. राज्यातील सर्वाधिक देवराई कोकणमधील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात आहेत. राज्यात जिथे जिथे देवराई आहेत, त्या सर्व देवराईंच्या दस्ताऐवजीकरणाचे काम सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.

वृक्षतोड, रासायनिक खतांमुळे निसर्गचक्र बाधित

वारेमाप वृक्षतोड, रासायनिक खतांचा शेतांमध्ये होणारा वापर यामुळे निसर्गचक्र चालवणाऱ्या कीटकांचा ऱ्हास होत आहे. रसायनयुक्त धान्यामुळे माणसांना होणाऱ्या आजारात वाढ झाली आहे. गवताळ प्रदेश नाहीसे झाले आहेत. जैवविविधता नष्ट झाली आहे. याच कारणामुळे भारतातून चित्ता नाहीसा झाला. लांडग्याची प्रजाती नष्ट होण्यामागील कारण देखील हेच आहे, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. 

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Attempts state biodiversity board preserve local ysh

ताज्या बातम्या