माझा मुलगा मला केव्हा पाहता येईल, या प्रतीक्षेत असलेल्या डोंगरे कुटुंबीयांना अखेर ३५ तासानंतर त्याच्या पार्थिवाचे दर्शन करायला मिळाले आणि सारा हुडकेश्वर परिसर नि:शब्द झाला होता. मंगळवारी सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रविवारी दुपारी वेणा जलाशयाकडे मौजमजा करण्यासाठी उदयनगरातील पंकज डोईफोडे, हुडकेश्वर भागातील गुरुकृपा नगरातील अतुल भोयर, अंबिका नगरातील प्रतीक आमडे, सुभेदार लेआऊट परिसरातील राहुल जाधव आणि शास्त्रीनगर येथील परेश कोटोके, दत्तात्रयनगरातील रोशन आणि अमोल दोडके हे सर्व मित्र गेले असताना त्यांची बोट पाण्यात बुडाली आणि क्षणात दोडके बंधू वगळता अन्य मित्रांना जलसमाधी मिळाली. सोमवारी सायंकाळपर्यंत एक एक करीत सर्वाचे पार्थिव बाहेर काढण्यात आले.

मात्र, अतुल डोंगरे याचे पार्थिव सोमवारी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून सर्व प्रयत्न होत असताना हाती लागलेले नव्हते. त्यामुळे डोंगरे कुटुंबीयांची चिंता वाढली होती. मुलगा मिळेल की नाही, या चिंतेत आईवडील आणि राहुल, पत्नी शरयू घरातच बसून होती. जोपर्यंत मुलगा मिळत नाही तोपर्यंत जेवण करीत नाही म्हणून आईवडील शांतपणे बसले होते, तर पत्नी शरयू खिन्न होऊन दीड वर्षांच्या मुलीला घेऊन बसली होती.

तलावाचा सारा परिसर शांत असताना मध्यरात्री तलावाच्या काठावर अतुलच्या नातेवाईकाला एक शव दिसल्यावर त्यांनी तिथे असलेल्या अग्निशमन आणि पोलीस विभागाला माहिती दिली. अंधारात काहीच दिसत नव्हते. त्यामुळे जवळ जाऊन बघितले तर ते शव अतुल डोंगरेचे होते. पहाटे ४ वाजता घरी माहिती देण्यात आल्यानंतर नागपूरवरून अतुलचे काही नातेवाईक घटनास्थळी पोहचले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. इकडे घरी त्याचे आईवडील, बहीण आणि इतर नातेवाईक रात्रभर केव्हा एकदा अतुलला बघायला मिळते याची आस लावून बसले होते. अखेर ९ वाजताच्या सुमारास अतुलचे पार्थिव हुडकेश्वर मार्गे त्यांच्या घरी पोहचले. सारे हुडकेश्वर आणि गुरुकृपानगर नि:शब्द झाले. परिसरातील महिला-पुरुषांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. अतुल ज्या शाळेत शिक्षक होता, त्या शाळेतील शिक्षक आणि त्याच्या मित्रांनाही अश्रू आवरता आले नाही. पत्नी शरयू आणि आई तर पांढऱ्या कपडय़ात गुंडाळलेल्या अतुलच्या पार्थिवाकडे एकटक  पहात असताना ओक्साबोक्शी रडायला लागली आणि वातावरण भावूक झाले. सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांच्या घरून अंत्ययात्रा निघाली आणि सारा परिसर डोंगरे परिवाराच्या दुखात सहभागी झाला.