नागपूर : नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला लक्ष्य करणारे भाजप नेते सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी तीव्र आक्षेप घेतला. खोत यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी लोंढे यांनी केली.

खोत यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा आक्षेप

नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थी संतप्त असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गरज नाही, विद्यार्थीच दहशतवादी आहेत, असे खोत यांनी म्हटल्याचा दावा करत काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या वक्तव्याचा निषेध केला. विद्यार्थ्यांना दहशतवादी संबोधणे हे अत्यंत आक्षेपार्ह असून सत्तेच्या अहंकाराचे प्रतीक असल्याची टीका त्यांनी केली.

‘सदाभाऊ ते गुंडाभाऊ’ असा प्रवास : लोंढे

सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे म्हणाले की, सदाभाऊ ते गुंडाभाऊ हा प्रवास तुम्ही इतक्या लवकर पूर्ण कराल, असे कधी वाटले नव्हते. शेतकरी, गरीब आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारी पूर्वीची भूमिका खोत यांनी सोडल्याचा आरोप त्यांनी केला. पुन्हा मंत्रिपद मिळवण्यासाठी खोत यांनी आपल्या विचारांशी तडजोड केली असल्याची टीका लोंढे यांनी केली. शिक्षणाच्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच गुंड आणि दहशतवादी म्हणणे लोकशाही मूल्यांना धरून नसल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असून ते लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचा अवमान करणारे वक्तव्य खोत यांनी केल्याचे लोंढे यांनी म्हटले. विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणे हा त्यांच्या न्याय्य संघर्षाचा अपमान आहे, असे सांगत त्यांनी खोत यांनी देशातील विद्यार्थ्यांची बिनशर्त जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.

‘लाठी-काठीच्या समर्थनातून सत्तेचा प्रयत्न’

दुसऱ्यांच्या मुलांवर अन्याय होत असताना त्याचे समर्थन करून सत्तेतील स्थान मिळवण्याचा प्रयत्न करणे दुर्दैवी असल्याची टीका लोंढे यांनी केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याऐवजी त्यांच्यावर आरोप करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही पाहिलेले सदाभाऊ आणि आजचे ‘गुंडाभाऊ’ यांच्यात जमीन-आस्मानाचा फरक आहे, असे म्हणत लोंढे यांनी खोत यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. या वक्तव्याबाबत खोत यांनी स्पष्टीकरण देऊन माफी मागावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.