शाळेतून एका विद्यार्थिनीला ऑटोने घरी पोहचून देणाऱ्या ऑटोचालकाने विद्यार्थिनीशी बळजबरीने अश्लील चाळे केले. विद्यार्थिनी त्याला हात जोडून विनंती करीत होती. तरीही ऑटोचालक तिच्याशी बळबजरी करीत होता. हा सर्व प्रकार एका महिलेने आपल्या घराच्या खिडकीतून मोबाईलने कैद केला. ती चित्रफित तिने वस्तीतील नागरिकांच्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर टाकली. त्यानंतर ती समाजमाध्यमावर प्रसारित झाली. अजनी पोलिसांनी वेळीच दखल घेऊन त्या ऑटोचालकाला शोधून काढले आणि पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे तो नराधम ऑटोचालक पोलिसांच्या जाळ्यात फसला.

हेही वाचा >>> ‘रिल’ बनवणे आणि हौस पूर्ण करण्यासाठी थेट शोरूममधून महागड्या गाड्यांची चोरी; अल्पवयीन शाळकरी मुले…

नागपुरातील परिमंडळ चारच्या परीसरात राहणारे एक दाम्पत्य शासकीय नोकरीवर असून त्यांनी एकुलती मुलगी आहे. ती सध्या नववीत असून तिला शाळेत पोहचून देण्यासाठी आणि शाळेतून घरी आणण्यासाठी ऑटो भाड्याने ठेवला आहे. ती मुलगी सातवीत असतानाच तो ऑटोचालक युवक त्या मुलीची ने-आण करीत होता. सध्या ती मुलगी नवव्या वर्गात असून गेल्या काही दिवसांपूर्वीच तिला शाळेतून घरी आणत असताना चालकाने ऑटो ओंकारनगरातील सह्यांद्री लॉनच्या मागे उभे केला.

विद्यार्थिनीशी तो अश्लील चाळे करायला लागला. विद्यार्थिनी त्याला हात जोडून दूर राहण्यासाठी विनवण्या करीत होती. तरीही तो विद्यार्थिनीशी बळजबरी करीत होता. हा सर्व प्रकार एका महिलेला खिडकीतून दिसला. त्या महिलेने मोबाईलने ऑटोचालकाचे वर्तन कैद केले. वस्तीतील नागरिकांना दाखवले. काही वेळानंतर ती चित्रफीत समाजमाध्यमावर वाऱ्यासारखी पसरली.

हेही वाचा >>> जमिनीच्या मोहापायी सख्ख्या भावाचा काढला काटा; भावासह दोन पुतणे गजाआड

शंभरपेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले

अजनी ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी स्वतःहून या प्रकाराची दखल घेतली. त्यांनी त्या ऑटोचालकाचा शोध घेण्यासाठी जवळपास शंभरावर सीसीटीव्ही फुटेज तपासले. शेवटी ऑटोचालकाचा शोध लागला. त्याला अजनी ठाण्यात आणले. त्याला खाक्या दाखवताच त्याने चित्रफितीतील ऑटोचालक असल्याची कबुली दिली. त्याने केलेल्या कृत्याबाबतही कबुली दिल्याची माहिती आहे.

मुलीचे पालक धास्तावले

अजनी पोलिसांनी त्या पीडित मुलीच्या पालकांशी चर्चा केली. मुलीचे पालक दोघेही शासकीय नोकरीवर आहेत. त्यामुळे मुलगी एकटीच घरी असते. झालेला प्रकार निंदनीय असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुलीचे समूपदेशन करून तिला धीर दिला गेला. या प्रकाराबाबतच्या कारवाईसाठी सध्या मानसिकरित्या तयार नसल्याचे पालकांनी सांगितले. वरिष्ठांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे अजनी पोलिसांनी सांगितले.