आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांचे आवाहन; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूर : हल्ली विविध रुग्णालयांत डेंग्यूसदृश रुग्ण प्रकृती खालावल्यावरच दाखल होत आहेत. यापैकी काही जण करोना चाचणीच्या भीतीपोटी विलंबाने उपचाराला जात आहेत. करोना चाचणीच्या भीतीमुळे ‘डेंग्यू’ जीवघेणा ठरतोय, असे मत आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी व्यक्त केले. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.

डॉ.  जयस्वाल म्हणाले,  प्रत्यक्षात डेंग्यू व करोनाची काही लक्षणे सारखी आहेत. त्यामुळे  दोन्ही आजारांची चाचणी झाल्यास वेळीच निदान व अचूक उपचार होऊन रुग्ण बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही चाचणीला न घाबरता उपचार घ्यायला हवे. नागपूर विभागाच्या अखत्यारित नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली हे सहा जिल्हे येतात. येथे २०१९ मध्ये १,३१६ डेंग्यूग्रस्त आढळले होते. यापैकी ११ रुग्ण दगावले. हे मृत्यूचे प्रमाण ०.८ टक्के होते. २०२० मध्ये येथे ५०३ रुग्ण आढळले. यापैकी दोघे दगावले.  मृत्यूचे प्रमाण ०.४ टक्के होते.  २०२१ मध्ये १ जानेवारी ते ७ सप्टेंबपर्यंत येथे २,५०६ रुग्ण आढळले. यापैकी ९ रुग्ण दगावले. मृत्यूचे प्रमाण ०.३५ टक्के आहे. प्रत्यक्षात वेळीच उपचाराने हे रुग्ण बरे होतात. परंतु त्यासाठी  एकही लक्षण दिसताच तातडीने चाचणी करून उपचार घ्यायला हवा. असे केल्यास डेंग्यूचे मृत्यू आणखी कमी होऊ शकतात. डेंग्यूच्या रुग्णांत प्लेटलेट २० हजारांहून कमी झाल्यावरच  प्लेटलेटची गरज भासते. इतर रुग्ण वेळीच औषधोपचाराने सहज बरे होतात. डेंग्यू व करोनाची काही लक्षणे एकसारखी आहेत. त्यामुळे सध्या नागपूर विभागातील शासकीय व खासगी रुग्णालयांत डेंग्यूसदृश आजाराचा रुग्ण गेल्यास त्याची डेंग्यू  आणि करोना चाचणी केली जाते. परंतु करोना चाचणीच्या भीतीपोटी काही रुग्ण रुग्णालय जात नाहीत. परिणामी, प्रकृती खालावते. त्यानंतरही शासनाने सर्व शासकीय रुग्णालयांत उपचाराची सर्व सोय केली आहे, याकडेही डॉ. संजय जयस्वाल  यांनी लक्ष वेधले.

डेंग्यू म्हणजे काय?

एडिस डास हा लहान व गडद रंगाचा असतो, त्याच्या वाकलेल्या पायावर पांढरे चट्टे असतात. त्याने चावा घेतल्यावर डेंग्यू होतो. एका अभ्यासात एडिस डास प्रामुख्याने दिवसा चावत असल्याचे निदर्शनात  आले आहे. ते सहसा गुडघे आणि कोपरावर चावा घेतात. रुग्णाला अचानक खूप जास्त ताप येणे, अंगदुखी, पाठदुखी, सर्दी-खोकला, डोळ्यामागे दुखणे, मळमळ, भूक न लागणे, अशक्तपणा, पोटात दुखणे, सर्व अंगावर पुरळ ही डेंग्यूच्या तापाची प्राथमिक लक्षणे आहेत. तुरळक प्रमाणात त्वचेतून, नाकातून, तोंडातून रक्तस्त्राव, प्रचंड अस्वस्थता (मेंदूत ऑक्सिजनची कमतरता) व ओटीपोटात वेदनाही डेंग्यूची लक्षणे असू शकत असल्याचे डॉ. जयस्वाल म्हणाले.

विभागात आठ सीसीएल प्रयोगशाळांची सोय

नागपूर जिल्ह्य़ात तीन आणि इतर पाच जिल्ह्य़ांत प्रत्येकी एक अशा नागपूर विभागात एकूण आठ सेंटिनेंटल सव्हिलेन्स प्रयोगशाळा आहेत. येथे पाच दिवसांहून कमी ताप असल्यास रुग्णाची एनएस १ ही एलायझा चाचणी केली जाते आणि  पाच दिवसाहून अधिक ताप असल्यास  आयजीएम अ‍ॅन्टीबॉडी ही चाचणी डेंग्यूच्या निदानासाठी केली जात असल्याचे डॉ. जयस्वाल यांनी सांगितले.

आजार टाळण्यासाठी हे करा..

घर परिसराची स्वच्छता, घराभोवती पाण्याची डबकी साचू देऊ  नये, पाण्याची भांडी नियमित घासणे, पाण्याच्या भांडय़ाला घट्ट झाकण लावणे, आवारात पडलेल्या टायरमधील पाणी, कुंडय़ातील पाणी, गच्चीत साचलेले पाणी याचा नियमित निचरा करावा. आठवडय़ातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा. घरातील सर्व भांडी घासून पुसून कोरडी ठेवावीत. या सर्व गोष्टी पाळल्या तर एडिस डास उत्पत्ती कमी होईल. सोबत कुलरचा वापर करत असाल, तर याची खात्री करा की ते व्यवस्थितरित्या वेळोवेळी स्वच्छ होईल. डासांचे औषधही वेळोवेळी फवारावे, असेही डॉ. जयस्वाल म्हणाले.