नागपूर: अयोध्येमधील राम मंदिराच्या दानपेटीतून पैशांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान त्यानंतर आता यावर पहिल्यांदाच आरएसएस राष्ट्रीय स्वयंसेवक सांघाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. तर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात यावर अप्रत्यक्षपणे संघाचा यात समावेश नाही हे पटवून दिले.
काय म्हणाले मोहन भागवत
समाजात विविध क्षेत्रांत अनेक प्रकारचे काम सुरू असल्याने ही सर्व कामे किंवा संस्था संघच चालवतो, अशी धारणा अनेकांची असते. तसेच संघाच्या केंद्रीय समितीकडून या संस्थांना दिशा दिली जाते किंवा त्यांचे नियंत्रण केले जाते, असाही समज समाजात प्रचलित आहे. मात्र, हा समज वस्तुस्थितीशी सुसंगत नसून संघाच्या कार्यरचनेत अशाप्रकारचे नियंत्रण किंवा संचालन करण्याची व्यवस्था नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.
संघ विचारांवर समाजाचा विश्वास नव्हता
‘डॉ. हेडगेवार : आधुनिक जगातील शालिवाहन’ या चित्रफितीचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते सायंटिफिक सभागृहात झाले. यावेळी आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश अवचट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. भागवत म्हणाले, संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी स्वतः कृतीतून आदर्श निर्माण केला. त्याच परंपरेत स्वयंसेवक क्षमतेनुसार कार्य करीत आहेत. काही जण विविध कारणांनी कार्यातून बाजूला झाले तरी इतर स्वयंसेवक कोणतीही टीका न करता समाजकार्य पुढे नेत राहतात. देशाला प्रगत करण्यासाठी ते स्वतःचे जीवन आदर्शमूल्यांनुसार घडवण्याचा प्रयत्न करतात. एकेकाळी संघ विचारांवर समाजाचा विश्वास नव्हता. देशाचा विकास केवळ पाश्चात्त्य राष्ट्रांच्या मार्गानेच होऊ शकतो, अशी धारणा प्रबळ होती. स्वातंत्र्यानंतरही हा विचार कायम होता, अशा परिस्थितीत समाजात स्वाभिमान आणि आत्मविश्वास जागवण्याचे कार्य संघाने हाती घेतल्याचे भागवत म्हणाले.
सक्रिय राहणे म्हणजे संघकार्य नव्हे
संघाचे कार्य केवळ व्यक्तीनिर्मितीपुरते मर्यादित नसून ते निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. देशाला परमवैभवाकडे नेणे हे संघाचे ध्येय आहे. संघाच्या शाखा या प्रशिक्षणाच्या प्रयोगशाळा असून तेथून तयार झालेले स्वयंसेवक समाजाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असतात. संघाविषयी समाजात विश्वास आणि प्रेम वाढले असून उपेक्षेचा काळ आता संपला आहे, सक्रिय राहणे म्हणजे केवळ संघकार्य नव्हे, तर संघाची जीवनमूल्ये आचरणात आणणे अधिक महत्त्वाचे आहे, असे डॉ. भागवत म्हणाले.
विदेशातील युवकांनाही स्वयंसेवकांसारखे प्रशिक्षण हवे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर समाजात संघाविषयी विश्वास आणि प्रेम वाढले असून, विदेशातील नागरिकही त्यांच्या देशातील युवकांना स्वयंसेवकांसारखे प्रशिक्षण देता येईल का, अशी विचारणा करीत आहे, असा दावा डॉ. मोहन भागवत यांनी केला. भारत जगाला मार्गदर्शन करेल, असा विश्वास वाढत असल्याचे सांगतानाच स्वयंसेवकांनी अखंडपणे कार्यरत राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
