नागपूर : डॉ. जयंत देवपुजारी हे प्रसिद्ध आयुर्वेदिक वैद्य आणि शैक्षणिक व प्रशासनिक क्षेत्रातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे.
त्यांनी बीएएमएस नंतर पीएच.डी. प्राप्त केली असून, अनेक वर्षे आयुर्वेदिक शिक्षण व संशोधन क्षेत्रात कार्यरत राहिले आहेत. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत त्यांनी केंद्रीय आयुर्वेदिक चिकित्सा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय, त्यांची नियुक्ती भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाच्या ( एनसीआयएसएम) अध्यक्षपदी करण्यात आली होती. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने डॉ. देवपुजारी यांची ही नियुक्ती रद्द केली.
यामागचं कारण म्हणजे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत झालेला वाद. एनसीआयएसएम अध्यक्षपदासाठी कायद्यानुसार एमडी किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे, मात्र डॉ. देवपुजारी यांच्याकडे पीएच.डी. असली तरी पदव्युत्तर पदवी नव्हती. त्यामुळे त्यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचं न्यायालयाने नमूद केलं.
नेमके प्रकरण काय?
नागपूरचे प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. जयंत यशवंत देवपुजारी यांची भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष पदावरील नियुक्ती दिल्ली उच्च न्यायालयाने अवैध ठरवून रद्द केली. डॉ. देवपुजारी या पदाकरिता पात्र नाहीत, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय व न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांनी हा निर्णय दिला.
डॉ. देवपुजारी यांच्या नियुक्तीला डॉ. वेद प्रकाश त्यागी व डॉ. रघुनंदन शर्मा यांनी आव्हान दिले होते. भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग कायद्यातील कलम ४(२) अनुसार आयोगाच्या अध्यक्ष पदी नियुक्त होणाऱ्या व्यक्तीकडे भारतीय चिकित्सा पद्धतीच्या कोणत्याही विषयामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी आणि भारतीय चिकित्सा पद्धती व शिक्षणाचा विकास, प्रगती व आरोग्य सेवा विभागाचे प्रमुख म्हणून किमान दहा वर्षे काम करण्याच्या अनुभवासह एकूण २० वर्षे व त्यापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
परंतु, डॉ. देवपुजारी यांच्याकडे पदव्युत्तर पदवी व आरोग्य सेवा प्रमुख पदी कार्य करण्याचा आवश्यक अनुभव नाही, असे न्यायालयाला आढळून आले. डॉ. देवपुजारी यांच्याकडे केवळ बी.ए.एम.एस. व पीएच.डी. पदवी आहे. पदव्युत्तर पदवी नाही. त्यांना एकूण ३६ वर्षांचा अनुभव आहे. त्यापैकी ११ वर्षे त्यांनी शिवायू आयुर्वेद कंपनीमध्ये ‘आर अॅण्ड डी’ आणि ‘एफ अॅण्ड डी’ विभाग प्रमुखपदी काम केले आहे. परंतु हा अनुभव कायद्यात बसत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
डॉ. देवपुजारी यांची १६ जानेवारी २०२१ रोजीच्या जाहिरातीनुसार आयोगाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली होती. आपल्या कार्यकाळात डॉ. देवपुजारी यांनी आयुर्वेद आणि यूनानी चिकित्सा क्षेत्रातील अभ्यासक्रम, प्रशिक्षण आणि गुणवत्ता नियंत्रण उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी विविध वेबिनार्स, सेमिनार्स आणि शासकीय कार्यक्रमांतून आयुष शिक्षणाच्या विकासासाठी कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पंचकर्म थेरपिस्ट कोर्ससारख्या उपक्रमांना चालना मिळाली.