यवतमाळ : आयुर्वेदिक औषधीचे साईड इफेक्ट होत नसल्याचा ग्राहकांचा भ्रम, दिग्रस येथील एका घटनेने दूर झाला. आयुर्वेदिक औषध असल्याचे सांगून ग्राहकांना ॲलोपॅथीचे घटक असणारे औषध विकले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. अधिक नफ्याच्या हव्यासापोटी परवानाधारक औषधी दुकानातून या आयुर्वेदिक औषधाची सर्रास विक्री सुरू आहे. दिग्रस येथील एका प्रकरणात प्रयोगशाळेच्या अहवालावरून औषधी विक्रेत्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहा महिन्यांपूर्वी मे महिन्यात घेतलेले आयुर्वेदिक औषधी नमुन्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

दिग्रस शहरातील नामांकित महावीर मेडिकल अँड जनरल स्टोअर्समधून ‘हृदयम’ नावाचे आयुर्वेदिक औषध विकले जात होते. औषधी निरीक्षकांनी मे २०२५ मध्ये याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले. तपासणीमध्ये वेदनाशामक औषधात ॲलोपॅथीचे घटक आढळून आले. औषधी विक्रेते नयन नविचंद गड्डा यांना औषधीच्या पुरवठादाराबाबत विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

सुरुवातीला ‘फ्लिपकार्ट’वरून औषधी मागविल्याचे सांगितले, मात्र त्याचे अधिकृत देयक दिले नाही. फ्लिपकार्ट कंपनीनेही या औषधीचा पुरवठा करत नसल्याचे एफडीएकडे स्पष्ट केले. औषधीचा उत्पादक कोण, वितरक कोण, याची माहिती विक्रेत्याने जाणीवपूर्वक लपवून ठेवली. त्यामुळे या प्रकरणात औषधी निरीक्षक मनीष गोतमारे यांच्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेनुसार सहकलम औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आयुर्वेदिक औषधांचा दुष्परिणाम होत नाही, डॉक्टरच्या सल्ल्याने घेण्याची गरज नाही, असा एक गैरसमज पसरला आहे. एखाद्याच्या अनुभवावरून, सांगण्यावरून आयुर्वेदिक औषधांचे सेवन केले जाते. मुळात ही औषधी खरंच आयुर्वेदिक आहे का, याची खातरजमा होत नाही.

अधिक नफ्यासाठी औषधी विक्रेते ग्राहकांची फसवणूक करतात. १०० टक्के आयुर्वेदिक सांगून अशा औषधीची विक्री केली जाते. विक्रेता केवळ त्याचा नफा पाहून अशी औषधी रुग्णांना देत आहे. त्यामुळे काही दिवसांनंतर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हा धोका ओळखून आयुर्वेदिक व इतर कुठलेही औषध तपासून खरेदी करावे, असे आवाहन एफडीएने केले आहे.

पांढरकवडा येथे पाकिस्तानातील औषध

दरम्यान पांढरकवडा येथे एका औषधी दुकानात ‘मेड-इन पाकिस्तान’ असलेल्या सौंदर्य प्रसाधनांचा साठा सापडला. ही सौंदर्य प्रसाधने आली कुठून याचा सुगावा लागला नाही. संबंधित विक्रेत्याने हैदराबाद येथील उत्पादकाचा पत्ता दिला होता. मात्र त्या नावाने कोणताही उत्पादक नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात बनावट औषधं विक्री सुरू असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.