नागपूर : प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत, “बाबासाहेबांचे नाव घ्यायला लाज वाटते काय?” असा थेट सवाल गिरीश महाजन यांना केला. ते नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले की, ज्यांचा बाबासाहेबांना विरोध होता, जे संविधान निर्मितीच्या काळात संविधानालाच विरोध करत होते, त्यांनाच आज सत्तेची खुर्ची लाभली आहे. आंबेडकरांचे नाव घ्यायला यांना लाज वाटते, ही गंभीर बाब आहे. या देशात राहण्याचा आणि सत्तेत बसण्याचा अधिकार संविधानामुळेच मिळतो. ज्यांच्या मनात संविधानच नाही, त्यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार आहे का, असा सवालही त्यांनी केला. बाबासाहेबांचे नाव टाळणे हा अपघात नसून जाणीवपूर्वक केलेला प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.
देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना नाशिकमध्ये मात्र या भाषणामुळे वाद पेटला. ध्वजवंदनानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. वन विभागातील माधवी जाधव या महिला कर्मचाऱ्याने यावर आक्षेप घेत थेट माध्यमांसमोर आपला संताप व्यक्त केला.
या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. निवडणुकीच्या काळात बाबासाहेबांच्या नावाचा आणि प्रतिमेचा वापर केला जातो; मात्र त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करण्याची वेळ आली की सत्ताधारी मौन पाळतात, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. हा प्रश्न केवळ एका भाषणापुरता मर्यादित नसून सत्ताधाऱ्यांच्या विचारधारेवर प्रकाश टाकणारा असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी वडेट्टीवार यांनी स्थानिक राजकारणावरही भाष्य केले. चंद्रपुरात काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा त्यांनी केला. मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये अद्याप एकमत नसून अंतर्गत वाद आणि पदांसाठी संघर्ष सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांवर सरकारने यापूर्वीही फसवणूक केल्याचा आरोप करत, नाशिकमधील शेतकरी मोर्चा सरकारचे पितळ उघडे पाडणारा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
“चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता स्थापन होईल आणि काँग्रेसचाच महापौर होईल. ते कसे होईल, हे येणारा काळ सांगेल. कोण कोणाला भेटले, ते आम्हालाही भेटून गेले आहेत. भाजपने मुस्लिम लीगसोबत युती केली तर ती योग्य ठरते; मात्र आम्ही केली तर चालत नाही, हे कसे? अचलपूरमध्ये भाजपने सत्तेसाठी युती केली. आम्ही स्वीकृत नगरसेवक पदासाठी केली तर त्यात चूक काय?” असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
