अकोला : ‘आम्ही प्रभू श्रीरामचंद्रांचे वंशज आहोत. डॉक्टरांना शरीरातील प्रत्येक रोगाची ज्याप्रमाणे माहिती असते, त्याच प्रमाणे शेतकऱ्यांना पिकांसंदर्भात ज्ञान अवगत असते. शेतकरी डॉक्टरपेक्षा कमी नाही. तरीही शेती करणे अडचणीचे का ठरते, याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे, असे मत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. आताची शेवटची कर्जमुक्ती आहे. आता यापुढे कर्जमुक्ती होणार नाही, असे वक्तव्यही त्यांनी केले.

सेवा सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी भरीव कार्य केल्याबद्दल सहकार मंत्र्यांचा विशेष सत्कार समारंभ अकोला-वाशीम मध्यवर्ती सहकार बँकेत शनिवारी आयोजित केला होता. यावेळी सत्कारमूर्ती म्हणून ते बोलत होते. बँकेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ संचालक डॉ. संतोषकुमार कोरपे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाला आमदार अमित झनक, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे, बँकेचे अध्यक्ष डॉ. जयराज कोरपे यांच्यासह संचालक मंडळ व्यासपीठावर उपस्थित होते.

देशातील इतर राज्यांमध्ये सहकाराकडे दुर्लक्ष

‘देशातील अनेक राज्यांमध्ये सहकाराकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे त्याठिकाणी बेरोजगारी वाढली. रोजगारासाठी ते लोक महाराष्ट्रात येतात. त्या तुलनेत महाराष्ट्रात सहकार क्षेत्र भक्कमपणे कार्य करीत आहे. सहकारात ९५ टक्के चांगले काम होते. सहकार चळवळीत थोडी फार सुधारणा झाली पाहिजे. त्यासाठी समर्पणाची भावना ठेऊन कार्य करावे लागेल,’ असे सहकार मंत्री म्हणाले.

‘गजानन महाराजांच्या प्रसादाने बुद्धी सूचली’

भाषणादरम्यान सहकार मंत्र्यांनी किस्सा सांगितला. सहकार नेते डॉ. संतोषकुमार कोरपे भेटीला आले आणि त्यांनी संत गजानन महाराजांचा प्रसाद आणला. महाराजांच्या प्रसादामुळे बुद्धी सुचली आणि गटसचिवांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. बँकांमध्ये पारदर्शकपणे नोकर भरती केली जात आहे. त्यामध्ये ७० टक्के स्थानिक, तर ३० टक्के इतर ठिकाणचे उमेदवार घेण्यात येत असल्याचे सहकारमंत्री म्हणाले.

कर्जमुक्तीच्या निर्णयात दिवं.अजित पवारांचा मोठा वाटा – डॉ. कोरपे

प्रास्ताविकात डॉ. जयराज कोरपे यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद केली. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांऐवजी एक लाखाची मदत करावी, अशी अपेक्षा आ.अमित झनक यांनी व्यक्त केली. सेवा सहकारी संस्थांना विशेष दर्जा देण्यात यावा, असे माजी मंत्री सुभाष ठाकरे म्हणाले. अध्यक्षीय भाषणात डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्मरण करून कर्जमुक्तीच्या नियोजनात त्यांचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले.

असंख्य अडचणीतून गटसचिव कार्य करतात. त्यांच्यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा केला. सहकार मंत्र्यांनी मोठा निर्णय घेऊन गटसचिवांना दिसाला दिला. सहकारात सांघिक शक्ती आहे. सहकारी संस्थेला बळकट करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. वाढता उत्पादन खर्च आणि कमी भावामुळे शेतकरी कायम अडचणीत असतो. शेतकऱ्यांना दरवर्षी मशागतीसाठी मदत करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा व कायद्यात देखील बदल अपेक्षित असल्याचे डॉ. कोरपे म्हणाले.