नागपूर: तीस्ता नदीचा वेगवान प्रवाह… त्यात वाहून गेलेले अवघे तीन-चार दिवसांचे हत्तीचे पिल्लू… पाण्याच्या प्रवाहात केवळ सोंड दिसत असताना त्याच्या मदतीला धावून आलेले पाच स्थानिक मच्छिमार आणि अखेर आईच्या कुशीत परतलेले ते नवजात पिल्लू. या हृदयस्पर्शी घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कळपापासून दूर गेले पिल्लू
पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील गजोल्डोबा परिसरात हत्तींचा कळप तीस्ता नदी पार करत होता. त्यावेळी अवघ्या तीन-चार दिवसांचे असलेले एक पिल्लू नदीच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. प्रवाहाचा वेग इतका होता की ते कळपापासून दूर गेले आणि बराच पुढे वाहत गेले. काही वेळाने पाण्यावर पिल्लाची केवळ सोंड दिसत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. नवजात पिल्लू पाण्यात वाहून जात असल्याचे दिसताच पाच मच्छिमारांनी त्याला वाचवण्याचा निर्णय घेतला.
३-४ किलोमीटर नदीत धाडसी शोधमोहीम
मच्छिमारांनी बोटीच्या मदतीने नदीत शोध सुरू केला. वेगवान प्रवाहाची पर्वा न करता त्यांनी सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतर पार केले. अखेर त्यांना पिल्लाचा ठाव लागला. मोठ्या काळजीपूर्वक पिल्लाला पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले. पिल्लाची सुटका झाली; मात्र त्याची खरी आई कुठे आहे, हा प्रश्न कायम होता. आईपासून वेगळे झालेल्या या पिल्लाला पुन्हा कळपात पोहोचवणे तितकेच महत्त्वाचे होते.
दोन तासांच्या शोधानंतर आईचा ठाव
बैकुंठपूर वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक मच्छिमारांनी पिल्लाला सोबत घेत आईचा शोध सुरू केला. जवळपास दोन तास परिसरात शोध घेतल्यानंतर अखेर कळपाचा ठाव लागला. पिल्लाचा आवाज ऐकताच त्याची आई त्याच्याकडे धावत आली. तिने मोठ्याने आवाज देत पिल्लाला प्रतिसाद दिला आणि क्षणाचाही विलंब न करता त्याला ओळखले. आईने पिल्लाला जवळ घेतले आणि त्याला दूध पाजले. काही वेळापूर्वी नदीच्या प्रवाहात जीवासाठी झगडणारे ते पिल्लू अखेर पुन्हा आईच्या कुशीत विसावले.
‘धन्यवाद’ मानत असल्याचा फोटोही चर्चेत
पिल्लाला वाचवल्यानंतरचा एक फोटोही समाजमाध्यमांवर विशेष चर्चेत आहे. बचावकर्त्याजवळ असताना पिल्लाने सोंड उंचावल्याचे या छायाचित्रात दिसते. अनेकांनी हा क्षण पिल्लाने बचावकर्त्यांचे आभार मानल्यासारखा असल्याचे म्हटले आहे. हत्तीच्या वर्तनाचा मानवी भावनांशी थेट संबंध जोडता येत नसला, तरी त्या छोट्याशा पिल्लाला वाचवण्यासाठी मच्छिमारांनी घेतलेले कष्ट आणि त्यानंतर आईशी घडवून आणलेली पुनर्भेट निश्चितच माणुसकीवरचा विश्वास अधिक दृढ करणारी आहे. वन्यजीव आणि माणूस यांच्यातील सहअस्तित्वाची ही हृदयस्पर्शी कहाणी सध्या समाजमाध्यमांवर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
