नागपूर : खळबळजनक! बाळ विक्री प्रकरणात एका भगवे वस्त्रधारी महाराजाचा नव्याने प्रवेश|baby selling case new entry maharaj case rajshree sen is the leader of this gang crime police nagpur | Loksatta

खळबळजनक! बाळ विक्री प्रकरणात एका भगवे वस्त्रधारी महाराजाचा नव्याने प्रवेश

स्विटीच्या गर्भात बाळ असतानाच राजश्रीने हैदराबाद येथील अग्रवाल दाम्पत्यांसोबत ५ लाख रुपयांना बाळ विक्रीचा करार केला.

खळबळजनक! बाळ विक्री प्रकरणात एका भगवे वस्त्रधारी महाराजाचा नव्याने प्रवेश
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

नागपूर : बाळ विक्री करणाऱ्या टोळीची प्रमुख राजश्री सेन हिने एका विद्यार्थिनीच्या गर्भातील बाळाचा सौदा केला. त्या बाळाची हैदराबाद येथील एका व्यापारी दाम्पत्याला विक्री केली. या प्रकरणी बाळ विक्री केल्याचा आणखी गुन्हा राजश्रीवर दाखल करण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदियामध्ये राहणाऱ्या एका बारावीच्या विद्यार्थिनी स्विटीचे (काल्पनिक नाव) एका युवकावर प्रेम होते. त्यातून ती गर्भवती झाली. दोघांनी खासगी रुग्णालयात जाऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळ निघून गेल्यामुळे गर्भपात होऊ शकला नाही. त्यामुळे दोघांनाही काहीही सूचत नव्हते. त्यामुळे तिने आपल्या आईवडिलांना गर्भवती असल्याबाबत सांगितले. तिच्या वडिलांना गोरेगाव महाराज यांनी राजश्री सेनचा मोबाईल क्रमांक दिला.

मुलगी प्रसूत होताच बाळ राजश्रीला देण्याचे सांगितले. महाराजांच्या सांगण्यावरून स्विटीने नागपूर गाठले आणि राजश्रीची भेट घेतली. राजश्रीने बाळाचा जन्म होताच बाळ दत्तक घेण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी स्विटीला काही आमिष दाखवले. स्विटीच्या गर्भात बाळ असतानाच राजश्रीने हैदराबाद येथील अग्रवाल दाम्पत्यांसोबत ५ लाख रुपयांना बाळ विक्रीचा करार केला. महिन्याभरात स्विटी प्रसूत होताच दोन दिवसांचे बाळ अग्रवाल दाम्पत्याला राजश्रीने विकले. हे प्रकरण शांतीनगरचे निरीक्षक भारत कऱ्हाळे आणि एएचटीयूच्या प्रमुख सहायक निरीक्षक रेखा संकपाळ यांनी उघडकीस आणले. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी ठाण्यात नोंद करून गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा तपासासाठी वर्ग करण्यात आला.

हेही वाचा: विश्लेषण: नवजात बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा कसा चालतो? ही समस्या उग्र का बनतेय?

बाळविक्री करणाऱ्या राजश्री सेनच्या टोळीत एका भगवे वस्त्रधारी महाराजाचा नव्याने प्रवेश झाला आहे. त्या महाराजाचा आश्रम असून तो गर्भवती तरुणी किंवा अनैतिक संबंधातील बाळांची विक्री करण्यासाठी राजश्री सेनच्या टोळीत कार्यरत होता. त्यामुळे पोलिसांच्या तपासाची दिशा एका महाराजाच्या आश्रमाकडे फिरल्याची माहिती आहे.

हेही वाचा: येथे गर्भातच होतो बाळांचा सौदा…!; अनेक निपुत्रिक दाम्पत्यांची नागपूरकडे धाव

अशी आली घटना उघडकीस
राजश्री सेनच्या मोबाईलमध्ये एका बाळाचे छायाचित्र होते. त्या बाळाचे फोटो हैदराबादमधील अग्रवाल दाम्पत्याला पाठविण्यात आले होते. शांतीनगरचे निरीक्षक कऱ्हाळे यांनी कसून चौकशी केला असता ते बाळ हैदराबादला विक्री केल्याचे समोर आले. राजश्री सेननेही एका विद्यार्थिनीला अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या बाळाची विक्री केल्याची कबुली दिली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 09:57 IST
Next Story
नागपूर: खाकी वर्दीतील दाम्पत्याच्या दुभंगलेल्या मनात खाकी वर्दीनेच पेरला आनंद