scorecardresearch

नवजात बाळ विक्री प्रकरण : विलास भोयरने पत्नीलासुद्धा फसवले

या टोळीचा सूत्रधार  भोयर याने आतापर्यंत शेकडो बाळांची विक्री करीत कोटय़वधी रुपये कमावले आहेत

नागपूर : बारावी नापास असलेला बोगस डॉक्टर विलास भोयर याने शासकीय रुग्णालयात डॉक्टर असलेल्या पत्नीचीसुद्धा फसवणूक केली. तिच्या आईवडिलांना डॉक्टर असल्याचे सांगून थाटामाटात लग्न केले. पती डॉक्टर नसून फक्त रुग्णवाहिकेचा चालक असल्याचे लग्नाच्या दहा वर्षांनंतर कळताच तिलाही धक्का बसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

नवजात बाळ विक्री प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. बारावी नापास असलेल्या विलासने काही वर्षे खासगी रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून काम केले. त्याने पाच लाख रुपये खर्च करून रात्रभरात पदवी घेतली. दुसऱ्याच दिवसापासून तो  थेट डॉक्टर झाला. त्याने नवजात बाळ विक्रीचा गोरखधंदा झपाटय़ाने सुरू करीत त्याने गुमथळा आणि वाठोडा येथे दोन रुग्णालय उभारली. त्याने लग्न करण्यासाठी डॉक्टर मुलीचा शोध घेतला. एका शासकीय रुग्णालयात डॉक्टर असलेल्या तरूणीच्या उच्चशिक्षित आईवडिलांची त्याने भेट घेतली. स्वत:ला डॉक्टर असल्याचे सांगून वैद्यकीय महाविद्यालयाचे बनावट ओळखपत्र, पदवी दाखवून त्यांच्या मुलीशी लग्न केले.  भोयरला आता १० वर्षांचा मुलगा आणि ८ वर्षांची मुलगी आहे. नवजात बाळ विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर लग्नाच्या दहा वर्षांनंतर पती बोगस डॉक्टर असल्याचे पत्नीला कळले. त्यामुळे तिलाही धक्का बसला. या टोळीचा सूत्रधार  भोयर याने आतापर्यंत शेकडो बाळांची विक्री करीत कोटय़वधी रुपये कमावले आहेत. त्याच्या टोळीत फार्मासिस्ट, पॅथॉलॉजीस्ट, महिला डॉक्टर, परिचारिका, रुग्णवाहिका चालक आणि अवैधरित्या लिंगनिदान चाचणी करणाऱ्यांचाही समावेश आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, निरीक्षक मनगटे यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी रेखा संकपाळ या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

कुख्यात गुंडासोबत छायाचित्रण

विलास भोयर हा त्याचे काळे धंदे उजेडात येऊ नये म्हणून कामठीतील कुख्यात गुंड रणजीत सफेलकर याच्याशी जुळला होता. अनेकदा सफेलकर हा भोयरच्या पार्टीत आणि कार्यक्रमात हजेरी लावत होता. तसेच भोयरने सफेलकरच्या माध्यमातून काही भूखंड विकत घेतल्याची माहिती समोर येत आहे.

आणखी एक बोगस डॉक्टर रडारवर

गुन्हे शाखेच्या रडारवर आणखी एक बोगस डॉक्ट आला असून त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. तो डॉक्टर कॉमर्समध्ये पदवीधर असून विलासच्या माध्यमातून त्यानेही पाच लाखात बोगस पदवी घेतल्याची चर्चा आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Baby selling racket twelfth failed bogus doctor vilas bhoyar cheated his wife zws

ताज्या बातम्या