यवतमाळ : देशात आणि राज्यात राजकीय, धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाच्या सावलीत शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रश्नांची हत्या होत असल्याचा घणाघात प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हिंदू म्हणून एकत्र येऊ शकतात, मराठा-ओबीसी एक होऊ शकतात, तर शेतकरी-शेतमजूर एकत्र का येऊ नयेत?, असा थेट सवाल बच्चू कडू यांनी केला. ते आज रविवारी स्थानिक विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्या सोमवार, ७ जुलैपासून १३८ किलोमीटरची सातबारा कोरा करा, ही पदयात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेच्या तयारीसाठी कडू आज यवतमाळ येथे आले होते. भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ ( जि. अमरावती) येथून सुरू होणाऱ्या या यात्रेचा समारोप महाराष्ट्रातील पहिली शेतकरी सामूहिक आत्महत्या म्हणून नोंद असलेल्या साहेबराव करपे यांचे जन्मगाव चिलगव्हाण (जि. यवतमाळ) येथे १४ जुलै रोजी होणार आहे. या यात्रेत कोणताही पक्षीय झेंडा नाही, असे कडू यांनी यावेळी स्पष्ट केले. ही यात्रा सरकारला दोष देण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांना जागवण्यासाठी आहे, असे कडूंनी स्पष्ट केले. मार्गात शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या देशात धर्म आणि जात दाखवून सामान्य कष्टकरी माणसाला वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. शेती विकायची, शोषण करायचं आणि कंपनीराज आणायचं हे सरकारी षड्यंत्र असल्याची टीका त्यांनी केली. मागील तीन महिन्यात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आपल्या हक्कांप्रती जागा झाला, तर सत्तेचे सिंहासन हादरेल, असा इशारा त्यांनी दिला. विठ्ठला, सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची सदबुद्धी दे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

सातबारा कोरा यात्रा केवळ आंदोलन नाही, तर शेतीवर चाललेलं षड्यंत्र उघडं पाडण्याची चळवळ आहे, असे ते म्हणाले. या निमित्ताने शेतकरी व मजूर एकत्र आले, तर सत्ताधाऱ्यांची झोप उडेल. त्यांच्या पँट ओल्या होतील, असे ते म्हणाले.

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाने साडे तीन लाख शेतकरी कुटुंबातील महिलांचे सिंदूर पुसले. ही यात्रा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मूक आक्रोश असून, सत्ताधाऱ्यांना हा आक्रोश महागात पडेल, असे ते म्हणाले. मजुरांना सहा महिन्यांपासून मजुरी नाही, हा सरकारचा असंवेदनशील चेहरा असल्याचे ते म्हणाले.

काम करणाऱ्यांचे महत्त्व सरकारला नाही. शेतमजूर, विधवा, दिव्यांग यांच्या हक्कांवर सरकार गदा आणत असल्याची टीका त्यांनी केली. मग्रारोहायो योजनेत पेरणी समाविष्ट करून, विधवा-दिव्यांग शेतकऱ्यांना यात जोडण्याची मागणी, त्यांनी यावेळी केली. शेतीचं व्यापारीकरण सुरू असून राज्यात कारखानदारांची हुकूमशाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. चार लाख कोटींचा खत-औषध व्यापार आहे, पण शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेणखताला सबसिडी नाही, हे धोरण बदलविण्याची गरज आहे, असे कडू म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारने भाकड गायींसाठी काय धोरण आणलं?

भाजप इतका हुशार दुसरा कोणताही पक्ष नाही. पण तरीही निवडणुकीआधी हिंदी सक्ती का केली? या षडयंत्राचे संशोधन व्हावे, असे कडू यावेळी म्हणाले. गाय वाचवण्याच्या घोषणा देणाऱ्या सरकारने भाकड गायींसाठी काय धोरण आणलं? प्रभू श्रीरामाची शपथ घेऊन सत्तेवर बसल्यावर जबाबदारी कुणाची?, अशी थेट टीका त्यांनी केली.