यवतमाळ : दुष्काळामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबे आर्थिक संकटात असताना कर्जवसुलीसाठी घरांना कुलूप लावण्याच्या फायनान्स कंपन्यांच्या कारवाईविरोधात शिवसेनेचे विदर्भ नेते, आमदार बच्चू कडू आक्रमक भूमिका घेतली. आज रविवारी आर्णी तालुक्यातील देऊरवाडी (बुटले) येथे फायनान्स कंपनीने कर्जवसुलीसाठी घराला लावलेले कुलूप त्यांनी स्वतः हातोड्याने तोडले. तसेच कुटुंबीयांना पुन्हा घरात प्रवेश मिळवून दिला. सक्तीच्या वसुलीविरोधात आगामी अधिवेशनात कायदा करण्यासाठी सरकारला भाग पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.
पोलिसांच्या बंदोबस्तात घराला टाळे
दुष्काळामुळे हाताला काम नाही, उत्पन्नाचे साधन नाही. अशा परिस्थितीत कर्जवसुलीसाठी घराला कुलूप लावून कुटुंबाला बेघर करणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला. देऊरवाडी येथील रवि संजय पञे (२८) यांनी तीन वर्षांपूर्वी घरबांधणीसाठी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. कंपनीने ५ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले असले, तरी प्रत्यक्षात २ लाख ७१ हजार रुपये मिळाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यापैकी सहा ते सात हप्त्यांपोटी सुमारे ३० हजार रुपये भरल्याची माहिती रवि यांचे वडील संजय पञे यांनी दिली. यंदाच्या दुष्काळामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने पञे कुटुंबीय मजुरीसाठी पुणे येथे गेले होते. त्यामुळे गावातील घराला कुलूप होते. दरम्यान, ३० सप्टेंबर २०२६ रोजी फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी पोलीस बंदोबस्तात गावात आले. त्यांनी कुटुंबीयांचे कुलूप काढून कंपनीचे कुलूप लावत घर सीलबंद केल्याचा आरोप आहे. प्रहारचे जिल्हाध्यक्ष नितीन चौधरी, तालुकाध्यक्ष रवि जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फायनान्स कंपन्यांचा एक रूपयाही भरू नका!
ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार बच्चू कडू यांनी फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीला सामूहिक विरोध करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रात ज्या ठिकाणी फायनान्स कंपन्यांनी घरांना कुलूप लावले आहे, तेथे ती कुलूपे तोडण्याची मोहीम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. सक्तीच्या वसुलीविरोधात आगामी अधिवेशनात सरकारला कायदा करण्यास भाग पाडू, असेही त्यांनी सांगितले. ‘दुष्काळात फायनान्स कंपन्यांचा एक खडकूही भरू नका!’ असे आवाहनही कडू यांनी यावेळी गावकऱ्यांना केले.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना दिला धीर
आर्णी तालुक्यातील बेलोरा (वन) येथील माजी सरपंच रवींद्र देवराव मनवर यांनी फायनान्सच्या कर्जाच्या तणावातून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. रविवारी त्यांच्या तेराव्याच्या विधीला आमदार बच्चू कडू यांनी गावात भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. मनवर यांच्यावर चार वित्तीय संस्थांकडून किमान पाच कर्जे असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी वारंवार घरी येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सततच्या तगाद्याला कंटाळून रवींद्र यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. आमदार कडू यांनी त्यांच्या पत्नीची आणि दोन दिव्यांग मुलांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
पाच हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीसाठी देण्यात येणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीवरही नाराजी व्यक्त केली. पाच हजार रुपयांत दिवाळीची व्यवस्थित तयारीही होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान १० ते १५ हजार रुपये दिवाळी अनुदान द्यावे. तसेच दुष्काळी मदत म्हणून प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
