अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांच्या प्रश्नांवर गेल्या महिन्यात आठवडाभर अन्नत्याग आंदोलन केले. सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केले, पण अजूनही ते आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. बच्चू कडू यांनी समाज माध्यमांवर आषाढी एकादशीनिमित्त मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्या सध्या चर्चेत आहेत.

‘विठ्ठला, मागील ३ महिन्यात महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय. दिवसरात्र शेतात राबून बळीराजा साऱ्या जगाचं पोट भरण्यासाठी आपला घाम गाळतो, कष्ट करून जीवाचं रान करतो. पण जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राजावरच उपाशीपोटी झोपायची वेळ सध्या आलीय.

विठ्ठला, आमची शेतकऱ्याची जात हाय. स्वतःच्या कष्टाचंच आम्ही खातो. फुकट काही मिळायची आमची अपेक्षा पण नसतेय अन तसलं आम्हाला पचनी पण पडत नाही. पण काबाडकष्ट करून, मातीत पैसा ओतून जो शेतमाल आम्ही पिकवतो त्यााला जर किमान बाजारभाव भेटला नाही अन नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे नुकसान झाले तर मात्र आम्ही कुणाकडे मदतीची याचना करायची? कुणाकडे पदर पसरायचा?

विठ्ठला तुझ्या दारात भक्ताला जात, पात, धर्म, रंग नसतो तसाच शेतकऱ्याच्या कपाळावरही फक्त शेतकरीच लिहिलेलं असतं. तेव्हा पांडुरंगा, राजकारण बाजूला ठेऊन सरकारला कर्जमाफीचा निर्णय देण्याची सदबुद्धी दे अशी तुझ्याकडे प्रार्थना’, अशा शब्दात बच्चू कडू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, पण अजूनही अनेक मागण्यांवर तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे बच्चू कडू हे आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर, विधवा, दिव्यांग, बेरोजगार, मेंढपाळ, मच्छिमार आणि मागासवर्गीय घटकांच्या मूलभूत हक्कांसाठी उद्या ७ जुलैपासून १३८ किलोमीटरची पदयात्रा सुरू केली जाणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सांगण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या अमरावती जिल्ह्यातील पापळ येथून पदयात्रेला प्रारंभ होणार असून दोनद, उंबर्डा बाजार, लोही, तरणोडी, मानकी, तळेगाव, दारव्हा, वळसा, लाखखिंड, तिवरी, चिरकूटा, तूपटाकळी, वसंतनगर, काळी दौलत, माळकिन्ही, गुंज, या गावांमधून ही पदयात्रा १४ जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण (साहेबराव करपे- पहिली शेतकरी आत्महत्या झालेले गाव) आंबोडा येथे पोहोचणार आहे. एकूण सात दिवसांत १३८ किलोमीटरचे अंतर पदयात्रेच्या माध्यमातून पार केले जाणार आहे.