अमरावती: माझ्यावर हत्येच्या कटाचा आरोप लावून मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा निव्वळ मला बदनाम करण्याचा आणि माझा आवाज दाबण्याचा राजकीय कट आहे, असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. आज एका व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा दावा करत सरकारवर जोरदार टीका केली. बच्चू कडू यांनी राजकीय वैमनस्यातून आपल्याला अपघातात ठार मारण्याचा कट रचल्याची तक्रार भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांनी दिल्यानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मी अटकेला घाबरत नाही, असे प्रत्युत्तर बच्चू कडू यांनी दिले आहे.

डिसेंबरमधील घटना एप्रिलमध्ये उघड?

बच्चू कडू यांनी या प्रकरणाच्या ‘टायमिंग’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, ही कथित घटना डिसेंबरमधील आहे, असे तक्रारकर्ते म्हणतात, मग चार महिन्यानंतर एप्रिलमध्येच गुन्हा कसा दाखल झाला? आमदाराच्या पुतण्याच्या हत्येच्या कटाचा आरोप लावून मला आत टाकण्याचे नियोजन सुरू आहे. ज्या तत्परतेने पोलिसांनी पहाटेपासून कारवाई सुरू केली, त्यावरून हे सर्व पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होते. मी शेतकरी, शेतमजुरांसाठी येत्या काळात आंदोलन उभारणार असल्याने माझा आवाज दाबण्यासाठी हे सर्व केले जात आहे.

प्रशासकीय यंत्रणेवर आरोप

बच्चू कडू यांनी पोलिसांच्या निष्पक्षेतवरही संशय व्यक्त केला. ते म्हणाले, सत्त्ता तुमची आहे, यंत्रणा तुमच्या हातात आहे. कुणालाही कशाप्रकारे फसवता येते, हे तुमच्यासाठी चुटकीसरशी होणारे काम आहे. माझ्या एका कार्यकर्त्याला पैशांचे आमिष दाखवून आणि धमकावून माझ्या विरोधात पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न झाला, त्याचे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

एव्हरेस्ट मोहिमेवर जाणार

बच्चू कडू म्हणाले की, ते उद्यापासून एव्हरेस्टच्या बेस कॅम्प मोहिमेवर जात आहेत. हे नियोजन १५ ते २० दिवसांपुर्वीच झाले होते. मी पळून गेलो, असा अर्थ कोणीही काढू नये. मी संविधान सोबत घेऊन या मोहिमेवर जात आहे. आम्ही रक्तदान करणारे लोक आहोत, कोणाचा जीव घेणारे नाहीत. शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी मी लढत राहीन आणि कोणत्याही अटकेला घाबरत नाही, असे बच्चू कडू म्हणाले.