अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना शिवसेना शिंदे गटातर्फे विधान परिषद सदस्यपदाची ‘ऑफर’ देण्यात आल्याचे सांगितले जात असतानाच त्यांच्या मार्गात भाजपने अडथळे निर्माण केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बच्चू कडूंच्या भूमिकेकडे लक्ष

बच्चू कडू यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. सुमारे अर्ध्या तासाच्या बैठकीत कडू आणि शिंदे यांच्या नेमकी काय चर्चा झाली, हे स्पष्ट झाले नसली, तरी विधान परिषदेच्या संधीबाबत बच्चू कडू यांनी सावध पवित्रा घेत, आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बच्चू कडूंची आंदोलनात्मक भूमिका

अचलपूर मतदारसंघातून चार वेळा कडू हे आमदार म्हणून निवडून आले. शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांवरून त्यांची आंदोलने राज्यभरात गाजली. नागपुरातील शेतकरी आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारने शेतकऱ्यांना जून पुर्वी कर्जमाफी दिली जाईल, असे जाहीर केले. आदिवासी, दिव्यांगांच्या प्रश्नांवर महिनाभरापुर्वी त्यांनी मेळघाटात ११ दिवस पदयात्रा काढली होती. प्रत्येक आंदोलनाच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी कडू यांच्याशी संवाद साधताना दिसले. कर्जमाफीचे संपूर्ण श्रेयही त्यांनी जाहीररीत्या बच्चू कडू यांना दिले होते.

भाजपाचा खोडा

बच्चू कडू यांना विधान परिषदेच्या सदस्यपदासाठी एकनाथ शिंदे गटातर्फे संधी देण्याच्या हालचाली दोन महिन्यांपासून सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यानच्या काळात भाजपच्या नेत्यांकडून बच्चू कडूंवर आरोपांचे सत्र सुरू झाले. बच्चू कडू यांनी राजकीय वैमनस्यातून आपल्याला ठार मारण्याचा कट रचल्याची तक्रार भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांच्या चुलत बंधूने दिल्यानंतर बच्चू कडूंवर गुन्हा दाखल करण्यात आला. भोंदूबाबा अशोक खरात सोबतच्या दोन वर्षांपुर्वीच्या भेटीची चित्रफित प्रसारित करण्यात आली. यात बच्चू कडू यांची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसून आला.

बच्चू कडूंच्या मदतीची गरज

शिवसेना शिंदे गटाला पश्चिम आणि पूर्व विदर्भात समन्वय ठेवून पक्षाला मदत करणारा नेता हवा आहे. त्यासाठी बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करावा, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. पण, त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. ते मर्यादित असले, तरी कडू हे तूर्तास शिंदे गटात प्रवेश करण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले जात आहे. शिंदे गटासोबत बच्चू कडूंची जवळीक ही भाजपच्या नेत्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. आता बच्चू कडू हे कोणता मार्ग स्वीकारतात, याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.