अमरावती: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) अकुशल मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. मेळघाटात मनरेगा अंतर्गत जी कामे घेण्यात आली, त्याची मजुरी तब्बल चार महिन्यांपासून प्रलंबित असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू संतप्त झाले आहेत. मेळघाटातील आदिवासींसाठी होळीचा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो. होळीच्या आधी मजुरीचे पैसे मिळाले नाहीत, तर येत्या २८ फेब्रुवारीला ‘मनरेगा’च्या आयुक्तांचे कार्यालय फोडण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
बच्चू कडू म्हणाले, मेळघाटातील मजुरांचे पैसे चार महिने उलटून गेले, तरी मिळाले नाहीत. आम्ही सरकारला पत्र दिले होते. होळीच्या आत सरकारने मजुरांचे पैसे दिले नाहीत, तर आम्ही आयुक्त कार्यालय फोडणार होतो. आता ६७ कोटी रुपये मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. नागपूर येथील ‘मनरेगा’ आयुक्तांना शासन निर्णय प्राप्त झाला आहे. निधी सुद्धा मिळालेला आहे. आयुक्तांनी जर मजुरांच्या पैशांचे वाटप सुरू केले नाही, तर आम्ही आयुक्तांचे कार्यालय फोडू. मेळघाटातील मजुरांचे पैसे होळीच्या आत मिळाले पाहिजेत, ही आमची आग्रहाची मागणी आहे, त्याची सरकारने दखल घ्यावी.
पुढील दोन-तीन दिवसांत मजुरीची रक्कम मिळेल
दरम्यान, मेळघाटातील मजुरांची रक्कम पुढील दोन ते तीन दिवसांत त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती ‘मनरेगा’चे नागपूर येथील आयुक्त डॉ. भारत बास्टेवाड यांनी शनिवारी दिली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) अकुशल मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. मेळघाट, पालघर तसेच इतर आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये मजुरांना काम उपलब्ध करून देताना वाढीव लेबर बजेट मंजुरीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे विचाराधीन असल्याने काही कालावधीपासून मजुरी अदा करणे प्रलंबित होते. नजीकच्या काळात आदिवासी बांधवांचा होळी सण येत असल्याने राज्य शासनाने मजुरांना तातडीने मजुरी अदा करण्यासाठी रु. ६७ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
सदर निधीची देयके कोषागाराकडे सादर करण्यात आली असून पुढील दोन ते तीन दिवसांत संबंधित मजुरांच्या खात्यात मजुरीची रक्कम जमा करण्यात येईल. तसेच, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्र शासनाने राज्याच्या १३ कोटी मनुष्यदिवसांच्या लेबर बजेटमध्ये वाढ करून सुधारित १६ कोटी मनुष्यदिवसांच्या लेबर बजेटला मान्यता दिली आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत मजुरांना नियमित रोजगार उपलब्ध होऊन मजुरी वेळेत अदा केली जाईल, असे डॉ. भारत बास्टेवाड यांनी सांगितले.
