अमरावती : महाराष्ट्रात दिव्यांग मंत्रालय स्थापन झाले. या विभागाचे मंत्री, सचिव, आयुक्त हे उत्तम काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून तुकाराम मुंढे रूजू झाल्यानंतर हे मंत्रालय वेगाने चालेल असे वाटले होते, पण ते त्यांच्याच तोऱ्यात आहेत, अशा शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
शासकीय सेवेत अंपगांसाठी असलेल्या ४ टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीची खातरजमा करण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने राज्य शासनाच्या सर्व ४० विभागांना त्यांच्या अपंग कर्मचाऱ्यांची माहिती मागवली होती. मात्र केवळ दोनच विभागांनी माहिती सादर केली असून ३८ विभागांनी माहिती देण्यास टाळाटाळ चालवली आहे. त्यावरून माजी मंत्री बच्चू कडू यांनी तुकाराम मुंढे यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बच्चू कडू म्हणाले, दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले. आता तुकाराम मुंढे यांच्याकडे सचिव म्हणून कारभार आला. यामुळे या मंत्रालयाच्या कामाला गती येईल, असे वाटत होते. पण मुंढे हे त्यांच्याच तोऱ्यात आहेत. दोन-तीन अपंग लोक त्यांचे प्रश्न घेऊन मुंढे यांना भेटण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्यांनी अपंगांनाच रजिस्ट्रेशन आहे का, तुम्हाला भांडण्याचा अधिकार आहे का, असे प्रश्न केले.
या विभागाकडे पाहण्याचा सचिवांचा, आयुक्तांचा दृष्टिकोन हा सकारात्मक नाही. ज्या प्रकारे मेळघाटात किंवा गडचिरोली जिल्ह्यात काम करण्यास सरकारी अधिकारी तयार होत नाहीत. अनिच्छेने या ठिकाणी काम करण्यासाठी अधिकारी येतात. अशीच स्थिती दिव्यांग कल्याण विभागाची झाली आहे. त्यात बदल होणे गरजेचे आहे. ही दिव्यांग मंत्रालयाची चुकी आहे. आम्ही यासंदर्भात पाठपुरावा केला. आंदोलनाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास हे मुद्दे आणून देण्यात आले, तेव्हा त्यांनी ते मान्य केले. पण त्यावर कारवाई होत नाही, हे दु:ख आहे.
बच्चू कडू म्हणाले, एकीकडे देशात धार्मिक भावना जपल्या जातात. पण, सेवाभाव का जपला जात नाही. दिव्यांगांच्या प्रती सद्भवाना ठेवणे आवश्यक आहे. जर या विभागात योग्य पद्धतीने काम होत नसेल, तर संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. कारवाई होत नसेल, तर आम्हाला पुन्हा मंत्रालयात जाऊन आंदोलन करावे लागेल. राज्यात एकही विभाग चांगला नाही. एक काम चांगले होत नाहीये. रुग्णालयांमध्ये जा किंवा शााळांमध्ये जाऊन पहा, सर्वत्र घुसखोरी सुरू आहे.

