अमरावती : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारच्या आश्वासनानंतर नागपुरातील ‘महाएल्गार’ आंदोलन स्थगित केले. सरकारने हे आंदोलन गुंडाळले, बच्चू कडूंनी माघार घेतली, असे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. त्यातच आता बच्चू कडू आणि एका कार्यकर्त्यामधील मोबाईलवरील संभाषण समाज माध्यमांवर प्रसारीत झाले आहे. त्यात बच्चू कडू यांनी आंदोलन स्थगित करण्याची कारणे सांगितली आहेत. ‘कर्जमाफी त्यांच्या बापालाही करावी लागेल, नाहीतर हा बच्चू कडू आहे, गांधीगिरीच्या नंतर भगतसिंहगिरीने उडवून टाकू कुणाला’, अशा शब्दात आपल्या तीव्र भावना व्यक्त करताहेत. 

बच्चू कडू यांनी आंदोलन सोडून मुंबईला जायला नको होते, असे आपल्या सहकाऱ्यांचे म्हणणे असल्याचे कार्यकर्त्याने सांगितल्यानंतर संभाषणादरम्यान बच्च कडू यांनी आंदोलन स्थळावरील परिस्थती कथन केली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनात लाखो लोक आणि आपल्या आंदोलनात शेवटी काही हजार लोकच शिल्लक उरले होते. कर्जमाफीसोबतच २२ मुद्यांवर मुख्यमंत्री, मंत्री किंवा सचिवांसोबत आंदोलनस्थळी चर्चा करणे शक्य नव्हते. आपल्याला कुणीही धमकी किंवा लालूच दाखवलेली नाही. कुणातही ती हिंमत नाही. ३५० गुन्हे दाखल आहेत. दोन गुन्ह्यांमध्ये तर शिक्षाही सुनावली आहे. सत्तेची लालसा असती, तर केव्हाच सत्तेत गेलो असतो. विरोधक आरोप करीत असतात. सर्वच जण सारखे नसतात. सर्व आंदोलनाला एकसारखे आपण पाहू शकत नाही. आपल्यावर टीका केली जात आहे, त्यात भाजपचा ‘सेल’ काम करीत आहे. आपलेही काही लोक आहेत. त्यांचे कारस्थान आता लक्षात येत आहे, असे बच्चू कडू म्हणताहेत.

आंदोलनादरम्यान दोन महत्वाची संकटे आल्याचे बच्चू कडू संभाषणादरम्यान सांगतात. एक संकट म्हणजे न्यायालयाचा आदेश आला, दुसरे पावसाचे संकट आले. बाहेरगावाहून ज्यांनी वाहने आणली होती, त्यांना परतही जायचे होते. अशा परिस्थितीत आमच्यसमोर सरकारसोबत चर्चा करणे हा पर्याय होता. जे सरकार योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेईल, असे म्हणत होते. सरकारने आता कर्जमाफीची तारीख जाहीर केली आहे. ती सरकारने केली नाही, तर एकतर बच्चू कडू फासावर जाईल, किंवा दुसऱ्याला फासावर लटकवेल, असा इशारा बच्चू कडू या संभाषणात देतात.

दरम्यान, ‘महाएल्गार’ आंदोलनाची समाज माध्यमांवर बदनामी केली जात असल्याचा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. भाजपची काही मंडळी हे बदनामीचे षडयंत्र रचत असल्याचा दावा त्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.