अमरावती: सोसाट्याचा वारा, खळाळते प्रवाह, खोल दऱ्या आणि केव्हाही बदलत जाणारे वातावरण या पार्श्वभूमीवर केलेला कोणताही क्रीडाप्रकार हा साहस या प्रकारात मोडतो. तेथे निसर्ग हाच प्रतिस्पर्धी असतो. सहकारी देखील असतो. यात शारीरिक ताकद आणि कौशल्य हा देखील महत्वाचा मुद्दा असतो. रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील लिंग्या घाटातील निसर्ग आणि तेथील धबधबा अनुभवणे म्हणजे वेगळाच आविष्कार. हा परिसर गडप्रेमी आणि ट्रेकर्सना खुणावत असतो. शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी ३०० फूट उंच लिंग्या धबधब्यावर ‘रॅपलिंग’चा थरारक अनुभव घेतला. त्यांच्या या साहसाची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.
लिंग्या घाट आव्हानात्मक
पुणे जिल्ह्यातील लवासा परिसराच्या पुढे असलेल्या लिंग्या घाटातील हा धबधबा पावसाळ्यात विशेष आकर्षण ठरतो. धामणहोळ हे या परिसरातील मुख्य गाव असून, हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, धुक्याची चादर आणि धबधब्याचा फेसाळता प्रवाह यामुळे लिंग्या घाटाला साहसी पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच निसर्गरम्य आणि आव्हानात्मक वातावरणात बच्चू कडू यांनी सुरक्षा साधनांचा वापर करत धबधब्यावरून रॅपलिंग केले. उंच कड्यावरून दोरीच्या साहाय्याने धबधब्याच्या प्रवाहातून खाली उतरण्याचा हा साहसी अनुभव त्यांच्या धाडसी आणि आव्हानात्मक गोष्टी स्वीकारण्याच्या वृत्तीचे दर्शन घडवणारा ठरला.
साहसी पर्यटनाला चालना मिळावी
सह्याद्री म्हणजे केवळ निसर्ग नाही, तर साहस, ऊर्जा आणि नव्या अनुभवांची भूमी आहे. अशा साहसी उपक्रमांमधून युवकांनी निसर्गाशी जोडले जावे आणि महाराष्ट्रातील साहसी पर्यटनाला चालना मिळावी, अशी भावना बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
यापुर्वीही केला आहे ट्रेक
धबधब्याच्या फेसाळत्या प्रवाहातून उंच कड्यावरून बच्चू कडू सुरक्षितरीत्या खाली उतरले. प्रत्येक क्षण हा रोमांचकारी आणि आव्हानात्मक होता. वेगाने कोसळणाऱ्या पाण्याचा मारा, उंच कड्याची खोली आणि दोरीच्या साहाय्याने खाली उतरण्याचे आव्हान यामुळे या साहसी उपक्रमात प्रचंड धैर्य, मानसिक तयारी आणि आत्मविश्वासाची आवश्यकता होती. मात्र कोणतीही भीती न बाळगता बच्चू कडू यांनी हे आव्हान स्वीकारले आणि संपूर्ण आत्मविश्वासाने रॅपलिंग पूर्ण केले. त्यांच्या या साहसी अनुभवाने उपस्थितांमध्येही उत्साह निर्माण झाला. बच्चू कडू यांनी यापुर्वी ८ दिवसांत माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पर्यंत ५ हजार ३६४ मीटरचा ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
