अमरावती: राज्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या निर्णयाकडे लक्ष लागलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने कर्जमाफीचा निर्णय घेण्याबाबत अडसर निर्माण झाला होता. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, निवडणूक आयोगाकडे सरकारने जेव्हा परवानगी मागितली; तेव्हा त्यांनी एक अट ठेवली. तुम्ही विषय मंजूर करून पुढील कार्यवाही करा, पण त्याची तुम्हाला घोषणा करता येणार नाही. ज्यामुळे आम्ही आज कर्जमाफीची अधिकृत घोषणा करू शकत नाही. आज निर्णय घेतला जाईल आणि निवडणूक संपल्यानंतर त्याची घोषणा केली जाईल. या निर्णयावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीचा निर्णय झाला आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो, असे बच्चू कडू म्हणाले. सरकारचे आम्ही आभार मानतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आणि खास करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. प्रहारचे कार्यकर्ते म्हणून, शेतकरी-शेतमजूर म्हणून असंख्य लोक या लढाईत सहभागी झाले होते. राजू शेट्टी, वामनराव चटप, अजित नवले, रविकांत तुपकर, महादेव जानकर या सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानायला हवे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची लढाई आम्ही जिंकली, पण यात प्रोत्साहन निधीची रक्कम ५० हजार रुपये आहे, ते वाढवून १ लाख रुपये करावेत, या मागणीसाठी आमचा लढा कायम राहील, असे बच्चू कडू म्हणाले.
हमीभावाची लढाई लढणार
बच्चू कडू म्हणाले, केवळ कर्जमाफी मिळवून आम्ही स्वस्थ बसणार नाही. हमीभावाच्या लढाईसाठी माझा शेतकरी उभा राहील. आम्ही कर्जमाफीचा लढा जिंकल्याचा आनंद आहे, पण शेतकऱ्यांना हमीभाव हवा आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही ती लढाई लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. बच्चू कडू यांनी गेल्या वर्षी नागपूर येथे कर्जमाफीच्या मागणीसाठी आक्रमक आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने कर्जमाफीचे ठोस आश्वासन दिले होते.
जूनपर्यंतची मुदत केली होती मान्य
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीची गरज आहे. आज त्यांना उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. जगण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे. या शेतकरी बांधवांसाठी ३० जूनपर्यंतच्या कर्जमाफीसाठी वेळ दिली. ३१ मार्चनंतर हे सर्व थकीबाकीदार होऊन त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळेल. राज्यातील सर्व गरजू शेतकऱ्यांचा सात-बारा यातून कोरा होईल, असे बच्चू कडूंचे म्हणणे होते.
