अमरावती: देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, पण मेळघाट अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. रोज थोडे-थोडे मरत जगण्यापेक्षा एक दिवस मरण्याची आमची तयारी आहे, असा जाहीर इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांनी शेकडो आदिवासींसह मेळघाटातील अतिदुर्गम भागातून २५० किमीची ‘मेळघाट संघर्ष यात्रा’ आणि कर्जमाफी आठवण पदयात्रा’ सुरू केली आहे.
सेमाडोह येथून काल प्रारंभ झालेल्या या यात्रेत शेकडो आदिवासी बांधव, शेतकरी आणि मजूर सहभागी झाले आहेत. १ ते ९ मार्च दरम्यान मेळघाटातील दुर्गम पाड्यांतून मार्गक्रमण केल्यानंतर ९ मार्च रोजी चिखलदरा येथे पदयात्रेचा समारोप होणार आहे.
सरकारवर जोरदार टीका
मेळघाटात आजही रस्ते नाहीत, पाणी नाही, रोजगार नाही; माता मृत्यू आणि कुपोषणाची भीषण समस्या कायम आहे. शेतकरी कर्जबाजारीपणामुळे होरपळतो आहे. सरकार फक्त घोषणा करते; प्रत्यक्षात काहीच करत नाही. ९ तारखेपर्यंत सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर ९ मार्चला आम्ही भगतसिंगाच्या विचाराचे पाऊल टाकू. सरकारला हतबल केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
कर्जमाफीची ‘आठवण’?
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. वारंवार दिलेली आश्वासने कागदावरच राहिली, असा आरोप बच्चू कडू यांनी केला. ते म्हणाले, ही यात्रा म्हणजे सरकारला दिलेली जाब विचारण्याची नोटीस आहे. ही यात्रा राजकारणासाठी नाही; जनतेच्या जगण्याच्या प्रश्नांसाठी आहे. मेळघाटातील आदिवासींच्या अस्तित्वाचा प्रश्न आम्ही रस्त्यावर आणला आहे. सरकार झोपले असेल तर त्यांना जागे करण्यासाठी हा लढा आहे.
मेळघाटातील ज्वलंत प्रश्न, संपूर्ण शेतकरी कर्जमाफी, कुपोषण व माता मृत्यू रोखण्यासाठी तातडीची उपाययोजना, रस्ते, पाणी, वीज व आरोग्य सुविधा, स्थानिकांना रोजगार हमी, दुर्गम भागासाठी विशेष पायाभूत सुविधा, यावर ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
१ ते ९ मार्चदरम्यान ही संघर्ष यात्रा मेळघाटाच्या पाड्यांतून फिरणार आहे. ९ मार्च रोजी सलोना ते चिखलदरा महापदयात्रा काढून समारोप केला जाणार असून, तो दिवस निर्णायक ठरेल, असा सूचक इशारा देण्यात आला आहे. सरकारने आमच्या प्रश्नांची दखल घेतली नाही, तर ९ तारखेपासून संघर्षाचा पुढचा टप्पा अधिक तीव्र असेल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
