Bachchu Kadu Vs Ravi Rana : अमरावतीच्या बडनेराचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी एकमेकांवर केलेल्या टीकाटीप्पणीनंतर दोघांमध्येही जोरदार वाद रंगला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, आता दोघांमधील वादाचा दुसरा अंक पुढे आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच दोघांमध्ये खडाजंगी झाल्याचं बघायला मिळालं आहे.

नेमकं काय घडलं?

अमरावतीत आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्र्यांनी बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील बंद असलेल्या फिनले मिलसाठी २० कोटी रुपये मंजूर केले. त्यावरून आमदार रवी राणा यांनी चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले. तसेच बच्चू कडू यांच्यावर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बच्चू कडू यांनी या मिलसाठी सहा महिन्यांपूर्वीच मंजूरी मिळाल्याचे सांगितले. मात्र, रवी राणा बोलायचं थांबले नाहीत. यावरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली.

हेही वाचा – अमरावती : ‘बच्‍चू कडूंनी उमेदवार मागे घेण्‍यासाठी पैसे मागितले’, आमदार रवी राणांच्या आरोपाने खळबळ

…याची त्यांना लाज वाटली पाहिजे – बच्चू कडू

दरम्यान, या बैठकीनंतर बच्चू कडू आणि रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना एकमेकांवर जोरदार टीका केली. “बच्चू कडू म्हणाले, काँग्रेसच्या काळात या मिल सुरू झाल्या आणि भाजपाच्या काळात बंद झाल्या. रवी राणा आज अचलपूरमधील मिलबाबत बोलत आहेत. मात्र, त्यांच्या मतदारसंघातील विजय मिल आणि स्विनिंग मिल या दोन कंपन्या गेल्या काही वर्षांपासून बंद आहेत. नवनीत राणा या खासदार असताना त्यांनी या मिल सुरु करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. तेथील कामगार उपाशी आहेत. पाच वर्षात आपण एकही मिल सुरू करू शकलो नाही, याची त्यांना लाज वाटली पाहिजे.”

बच्चू कडूंना रवी राणांचे प्रत्युत्तर

बच्चू कडूंच्या या टीकेला आमदार रवी राणा यांनीही प्रत्युतर दिलं. “बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील मिल केल्या पाच वर्षांपासून बंद आहे. तिथल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, बच्चू कडू यांनी कधीही तिथं भेट दिली नाही. त्यांनी कधीही हा मुद्दा सरकारसमोर उचलला नाही. त्यांनी कधी तिथल्या कामगारांविषयी सहानुभूतीसुद्धा दाखवली नाही. आता आयत्या पिठावर नागोबा बनून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत श्रेय घेण्याचा प्रयत्न बच्चू कडू करत आहेत”, असे ते म्हणाले.