अमरावती : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर एका आठवड्याच्या आत सुनावणी सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले असताना त्यावर आता चर्चा सुरू झाली आहे.भाजपने ‘प्लॅन बी’ तयार केल्याचे सांगितले जात आहे. आता त्यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवार मुख्यमंत्री होणार? या चर्चेवर बच्चू कडू म्हणाले की, ”असे होऊ शकत नाही. तसे झाल्यास मोठ्या प्रमाणावर भाजपला परिणाम भोगावे लागतील. एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचे ५ ते १० टक्के मतदार नाराज होतील. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपचे काही प्लॅन कामी येणार नाही,”
बच्चू कडू म्हणाले, ” आताच ज्या काही गडबडी झाल्या, त्यामुळे नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. जर एकनाथ शिंदे यांना बाहेर काढले, तर नाराजी वाढणार आहे. नाराजीच्या सुराची टक्केवारी वाढली, तर तुमचे कोणतेही प्लॅन कामी येणार नाहीत, लोक त्यांचे प्लॅन सुरू करतील. मग, लोकच कोणता पक्ष ठेवायचा, हे ठरवतील.”आरक्षणाच्या मागणीवर आमदार बच्चू कडू म्हणाले की, सरकारने एकदा आरक्षणाचा मुद्दा संपवला पाहिजे. आरक्षण विषय हा राजकीय लोकांनी केलेली व्यवस्था आहे. विकासाची व्यवस्था निर्माण होऊ शकली नाही.त्यामुळे विकासावर मते मिळू शकले नाहीत. आता निवडणुकीत आरक्षणावर मते मागितली जाणार. जातीचे मुद्दे घेऊन मते मागणार, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला.



