अमरावती: माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. कडूंची विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का, असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला होता. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकातूनही कडू यांच्यावर ‘प्रहार’ करण्यात आले आहेत. त्यावर प्रथमच बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
कडूंचे जंगी स्वागत
बच्चू कडू यांचे आज त्यांच्या कुरळ पूर्णा येथील निवासस्थानी आगमन झाले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना कडू यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. बच्चू कडू म्हणाले, मी शिवसेनेत प्रवेश केला हा निर्णय काही मजबुरी म्हणून घेतला नाही, तो मी परिस्थितीमुळे घेतला आहे. जनतेने नाकारले म्हणून नेत्याकडे जावे लागले. बच्चू कडू २५ वर्षे जनतेलाच आपला नेता समजत होता. आमचे कार्यकर्ते निवडणूक आली तेव्हा काही जण भाजप, काही राष्ट्रवादीत गेले. प्रहारच्या नावाने निवडून येत नाही म्हणून ते दुसऱ्या पक्षात गेले.
धनुष्यबाणातून ‘प्रहार’ करणार
बच्चू कडू म्हणाले, आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत ३२ उमेदवार उभे केले एकही निवडून आला नाही. आम्ही काय चूक केली. लोकांसाठी चळवळ उभी केली. सामाजिक कार्य करणाऱ्यांनी लोकप्रतिनिधी होऊच नाही का? गुवाहटीला गेलेले सर्व निवडून आले मी एकटाच पडलो. मी चुका केल्या मान्य करतो,पण त्या इतक्याही मोठ्या नव्हता. कार्यकर्ता टिकावा म्हणून मी निर्णय घेतला. धनुष्यबाणातून प्रहार करणार आहे, प्रहार कायम राहणार आहे. गेली २५ वर्षे प्रहार संघटना जनतेसाठी लढली आहे. झेंडे बदलले म्हणून अजेंडा बदलणार नाही तो कायम राहील.
शेतकरी, दिव्यांग अग्रस्थानी
शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग बांधव हे आमच्यासाठी अग्रस्थानी असतील. हे सर्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले. त्यांनी सांगितले की, तुमच्या सर्व कार्यांसाठी शिवसेना तुमच्यासोबत आहे. काही गोष्टी लढून नाही तर गनिमी काव्याने सिद्ध कराव्या लागतात. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि रणनिती राहिली आहे. माझा प्रवेश हा कार्यकर्त्यांच्या आग्रहातून झालेला आहे. मी शेतकरी मुद्दा सोडून बाहेर जाणार नाही. आमदारकी किंवा मंत्रीपदापेक्षा जनतेचे काम मोठे आहे. टीका फार मनावर घेऊ नये.
