अमरावती: प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजकीय वैमनस्यातून आपल्याला अपघातात ठार मारण्याचा कट रचल्याची तक्रार भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांनी दिल्यानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. बच्चू कडू यांनी या आरोपांचे खंडन केले असताना “बच्चू कडू हे नाव नसून तो एक ‘बिच्छू’ (विंचू) आहे”, अशा जहाल शब्दांत प्रवीण तायडे यांनी कडू यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
‘ऑडिओ क्लिप’ आणि अपघाताचा बनाव
आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांना अपघाताचा बनाव करून ठार मारण्याचा कट या कथित ऑडिओ क्लिपमध्ये चर्चिला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना तायडे म्हणाले की, राजकारणात वैचारिक मतभेद नवे नाहीत. पण, एखाद्याचा जीव घेण्याची भाषा बोलण्यापर्यंत मजल जाणे, हे धक्कादायक आहे. ही क्लिप समोर आली नसती, तर एका निष्पाप बालकाने आपले वडील गमावले असते. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या अभिजीत तायडे यांना सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
विकासाच्या पोटदुखीतून कटकारस्थान?
या वादाला केवळ गुन्हेगााी स्वरून नसून त्याला अचलपूरमधील ‘क्रेडिट वॉर’ची किनार आहे. गेल्या २० वर्षांत रखडलेला अमरावती-परतवाडा मार्ग, सिंचन प्रकल्प आणि एमआयडीसीचे प्रश्न मार्गी लागत असल्यामुळे बच्चू कडू अस्वस्थ झाल्याचा आरोप तायडे यांनी केला. फिनले मिल बंद पडणे आणि संत्री प्रक्रिया उद्योगात आलेले अपयश झाकण्यासाठी कडू आता हिंसेचा मार्ग अवलंबत आहेत. निवडणुकीतील पराभव हा कठडू यांच्या जिव्हारी लागला असून मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या पाठबळावर सुरू असलेल्या विकासकामांचा त्यांना हेवा वाटत आहे, असे तायडे म्हणाले.
यवतमाळच्या टोळ्यांचा उल्लेख
या प्रकरणी कथित ऑडिओ क्लिपमध्ये यवतमाळ आणि वणी येथील गुन्हेगारी टोळ्यांचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येते. यावर भाष्य करताना तायडे यांनी या कथित टोळ्यांचे ‘म्होरक्या’ बच्चू कडू आहेत का, असा सवाल उपस्थित केला. ज्या ८० हजार मतदारांनी कडू यांचा पराभव केला, त्यांच्यावर कडू यांनी बॉम्ब टाकावा का?, असा सवालही त्यांनी विचारला. पत्रकार परिषदेला भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय आदी उपस्थित होते.
