अमरावती: राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आलेला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत उमेदवारांविषयी अद्यापही निर्णय होऊ शकलेला नाही. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यासाठी पक्षाचे शिवसेनेते विलीनीकरण करावे, अशी अट ठेवण्यात आल्याचे समजते. पण, त्यावरून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच मतांतरे दिसून आली आहेत.

उमेदवारांच्या नावांवरून मतभेद

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांची नावे निश्चित केल्याचे वृत्त होते. मात्र, या दोन्ही नावांना शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळातून विरोध होत असल्याचे सांगितले जात आहे. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल असल्याने, एकनाथ शिंदे यांच्याकडे आता केवळ दोन दिवसांचा अवधी उरला आहे. ते पक्षातील नाराजी दूर करून कुणाच्या नावांवर शिक्कामोर्तब करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

उमेदवारी देण्यासाठी ठेवली अट

बच्चू कडू यांच्या नावावरूनही शिवसेनेच्या एका गटात नाराजीचा सूर आहे. बच्चू कडू यांचा शिवसेनेशी संबंध काय? असा थेट सवाल काही नेत्यांनी उपस्थित केला आहे. बच्चू कडू यांना जर शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी द्यायची असेल, तर त्यांनी आपला प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करावा, अशी अट काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवल्याचे समजते. मात्र, या प्रस्तावावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

बच्चू कडू समर्थकांमध्ये मतांतरे

बच्चू कडू यांनी विधान परिषदेच्या उमेदवारीविषयी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यांनी अद्याप आपला निर्णय जाहीर केलेला नाही. बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष हा आंदोलनात्मक भूमिकेसाठी ओळखला जातो. हा पक्ष शिवसेनेत विलीन केल्यास पक्षाची ओळखच संपेल आणि कार्यकर्त्यांवर मर्यादा येतील, असे प्रहारच्या बहुतांश कार्यकर्त्यांचे मत आहे. दुसरीकडे, एका गटाने शिवसेना शिंदे गटातर्फे संधी मिळाल्यास सत्तेत सहभागी होण्यास हरकत नाही, असे मत व्यक्त केले आहे. बच्चू कडू यांच्यासमोर सध्या मोठा पेच आहे. पक्षसंघटनेचा विस्तार करायचा की, शिवसेना शिंदे गटाला बळ द्यायचे, यावर पक्षातच मंथन सुरू आहे. वेगवेगळ्या मतप्रवाहांमधून बच्चू कडू यांना निर्णय घ्यावा लागणार आहे.