शहरातील सिमेंट रस्त्यांवर भेगा पडल्याने रस्ते बांधकामासाठी नेमलेल्या सल्लागार कंपन्यांचे पितळ उघड पडले असून बांधकाम साहित्यांचे प्रमाण चुकीचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर ‘मिक्स डिझाईन’चे गुणोत्तर बदलण्याची नामुष्की ओढावली आहे.

सिमेंट रस्त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यांच्या बांधकामात व्हीएनआयटी आणि जिओ-टेक दोन वेगवेगळ्या कामासाठी सल्लागार आहेत. व्हीएनआयटीकडे रस्त्याचे ‘स्ट्रक्चरल डिझाईन’चे काम आहे. यामध्ये रस्ता किती फुटाचा असावा, किती जाडीचे काँक्रीट वापरले जावे, सांधे किती अंतरावर आणि कुठे असावे आदी बाबींचा समावेश आहे. जिओ-टेक कंपनीकडे ‘मिक्स डिझाईन’चे काम आहे. यामध्ये सिमेंट- वाळूचे प्रमाण, कोळशाची राख किती वापरावी, पाणी कोणते आणि किती वापरावे, लोखंडी साखळींचे प्रमाण आणि अंतर आदी बाबींचा समावेश आहे.

‘मिक्स डिझाईन’ गुणोत्तर चुकल्याने रस्त्यांना भेगा पडल्याचे व्हीएनआयटीमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रस्ते तयार करताना कंत्राटदारांनी सिमेंट ऐवजी कोळशाच्या राखेची मात्रा अधिक ठेवली. राखेचे मिश्रण असलेले सिमेंट वापरण्यात आले आणि पुन्हा बाहेरून राख मिसळण्यात आली. त्यामुळे सिमेंट कमी आणि राख अधिक झाली, असा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे. परंतु जिओ-टेकला मिक्स डिझाईनमध्ये त्रुटी राहिल्याचे मान्य नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार इंडियन रोड काँग्रेसने ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणे सर्व साहित्याचे प्रमाण निश्चित करण्यात आले. प्रयोगशाळेत ‘मिक्स डिझाईन’ची चाचणी घेतल्यानंतर कंत्राटदारांना त्यानुसार बांधकाम साहित्य वापरण्याची सूचना देण्यात आली. त्यापूर्वी कंत्राटदारांना प्रशिक्षण देखील देण्यात आले, असे सांगतानाच जिओ-टेकचे मुख्य सल्लागार अभियंता ए.एम. सिंगारे यांनी भेगा पडण्याची कारणे वेगळी असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी स्पष्टपणे काहीच सांगितले नाही, परंतु त्यांच्या बोलण्यातून कंत्राटदार यासाठी जबाबदार असावे, असे संकेत मिळाले.

जिओ-टेकने दिलेल्या ‘मिक्स डिझाईन’ नुसार कंत्राटदारांनी बांधकाम साहित्याचे प्रमाण ठेवले नसावे, असाच यातून निष्कर्ष निघतो आहे. जनमंचने शहरातील काही सिमेंट रस्त्यांची पाहणी केली होती. त्यांच्या तपासणीत रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आता महापालिका अधिकारी, कंत्राटदार, सल्लागार रस्ते बांधकामात सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सिमेंट प्रमाण वाढवले

व्हीएनआयटीने ‘जिओ-टेक’च्या मिक्स डिझाईनमध्ये बदल केले आहे. ‘आयएस- १०२६२’नुसार प्रयोगशाळेत बांधकाम साहित्याचे मिश्रणाची चाचणी घेण्यात आली. ‘जिओ-टेक’ने तयार केलेल्या मिश्रणामुळे बळ (स्ट्रेंथ) येत नसल्याचे दिसून आले. त्यात आता सिमेंटचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. रस्ते बांधकाम करणाऱ्या सहाही कंत्राटदारांना हे ‘मिक्स डिझाईन’ देण्यात आले आहे, असे व्हीएनआयटीच्या सूत्रांनी सांगितले.

आमच्याकडे बांधकामाची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी आहे. ‘इंडियन रोड काँग्रेस’ मानकाप्रमाणे सर्व बांधकाम साहित्य प्रमाणात आहेत. भेगा पडण्याची कारणे वेगळी आहेत. ए.एम. शिंगारे, मुख्य सल्लागार अभियंता, जिओ-टेक.