नागपूर : बागेश्वर धाम सरकारचे प्रमुख (पीठाधीश्वर) धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी शुक्रवारी नागपुरात छत्रपती शिवरायबाबत वादग्रस्त विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत केले. धीरेंद्र शास्त्री नेमके काय म्हणाले, याबाबत आपन जाणून घेऊ या.

नागपुरातील जामठा येथील नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल परिसरात शुक्रवारी भारतदुर्गा मंदिराचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, अवधेशानंद गिरी, गोविंद गिरी, मित्रानंद, साध्वी ऋतंभरा, शैलेश जोगळेकर, ॲड. सुनील मनोहर आदी उपस्थित होते. 

धीरेन्द्र शास्त्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देत सांगितले की, एका मोहिमेनंतर शिवाजी महाराज थकले होते आणि ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले. त्यांनी आपला मुकुट काढून त्यांच्या पायाशी ठेवत आपण थकलो असून आता राज्यकारभार सांभाळावा, अशी विनंती केली. त्यावर रामदास स्वामींनी ती मान्य केल्याचे सांगितले.

पुढे त्यांनी ‘तू माझा शिष्य आहेस आणि मी तुझा गुरु’ असे सांगत पुन्हा मुकुट शिवाजी महाराजांच्या मस्तकावर ठेवला आणि राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. यावरून भारतात महामानवांचा जन्म झाला आहे, असे ते म्हणाले. भारतदुर्गा मंदिर लोकांचा गौरव वाढवेल आणि त्यातून अखंड भारताची संकल्पना बळकट होईल, असेही त्यांनी नमूद केले.

भाकड कथा – इंद्रजीत सावंत

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “उत्तरेकडील हे जे बाबा महाराज आहेत त्यांच्या डोक्यात शिवाजी महाराजांचा चुकीचा आणि खोटा इतिहास डोक्यात बसला आहे. शिवाजी महाराज हे लढून थकणारे नव्हते हे जगजाहीर आहे कारण तसे संदर्भ देखील नाहीत. या सर्वकाही भाकड कथा आहेत, याला इतिहासात एक कणाचा देखील आधार किंवा पुरावा नाही.

त्याचबरोबर रामदास स्वामींकडं त्यांनी सगळा राजपाट सोपवला हे सर्व थोतांड आहे. याविषयी काही बोगस कागदपत्रे लंडनमधून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न झाला होता. यावर इतिहासकार गजानन मेहेंदळे यांनी स्वतःचं सांगितलं होतं की हे सगळं काही खोटं आहे.

ही उत्तरेकडील माणसं येऊन महाराष्ट्राला इतिहास शिकवत आहेत. ज्यांच्या कित्येक पिढ्या मुघलांची गुलामी करण्यात गेल्या. पण महाराष्ट्र स्वाभिमानानं या परकीय राजवटींविरोधात उभा राहिला. महाराष्ट्रानं अशा इतिहासाचा अभ्यास नाही, महाराष्ट्राबद्दल कणवं नाही त्यांना महाराष्ट्रातील लोक का बोलवतात याचा बुद्धी शाबूत ठेवून विचार करायला पाहिजे.