वर्धा – विविध रंगी पक्ष्यांचा किलबिलाट मन मोहून टाकतो. पक्ष्यांचे विश्वच न्यारे, असे पक्षीमित्र सांगतात.बहार नेचर फौंडेशन ही संस्था पक्षी संवर्धनात अग्रेसर म्हणून ओळखल्या जाते. संस्थेने सालोड येथील आयुर्वेद महाविद्यालयाच्या वनौषधी उद्यानात या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी पक्षी विश्वाचे विविध पैलू पूढे आले. माळढोक, तणमोर, सारस यासारखे पक्षी दुर्मीळ झाले असून पक्ष्यांच्या वैविध्यपूर्ण अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी आज वनविभाग कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक हरवीर सिंग यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहारचे अध्यक्ष डाॅ. बाबाजी घेवडे होते. या समारोहाला आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भरत राठी, दत्ता मेघे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पेठे, वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी, मानद वन्यजीव रक्षक तथा बहारचे उपाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, दीपक गुढेकर, आयुर्वेद महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. गौरव सावरकर, मेघे अभिमत विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संयोजक डाॅ. अमित रेचे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. किशोर वानखडे म्हणाले, पक्षी म्हटले की आपल्याला केवळ झाड आठवते. मात्र, जंगलांसोबतच ओसाड माळरान, गवताळ प्रदेश, टेकड्या, तलाव, नदीनाले, पानथळ व दलदलीच्या जागा, सागर किनारे या सर्व ठिकाणी पक्ष्यांचा अधिवास असून त्याचेही संरक्षण आपण केले पाहिजे. अतुल शर्मा यांनी, जीवन समृद्ध करायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या गरजा मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले.
तर, निसर्गावर प्रेम करायला लागलो की आपण आपोआपच पर्यावरणाचे संरक्षक बनत जातो, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात डाॅ. बाबाजी घेवडे यांनी केले. पक्षी विषयक माहिती देण्यात आली.
मनुष्यास जश्या मोह, प्रेम, मत्सर अश्या भावना असतात तश्याच पक्ष्यांना पण असतात. सुगरण पक्ष्याचा खोपा सगळ्यांनी पाहलेला. हा खोपा नर सुगरण पक्षी आपल्या प्रेयसीस खुश करण्यास बांधतो. एकदा बांधलेला खोपा तिला आवडला नाही तर परत बांधतो.तो सजविण्यासाठी नवनवे साहित्य वापरतो. त्यांचे पण इंटेरियर डेकोरेशन असते. एकमजली, दोन मजली खोपे आकारास येतात. खंड्या, धनेश हे पक्षी विविध भक्ष्य मादीला गिफ्ट देतात.
धनेश मादीने अंडी घातल्यावर नर तिची पूर्ण काळजी घेतो.तिच्या चोचित अन्न पुरवितो. पिल्लं उडेपर्यंत सेवा करतो. लांडोरची मनधरणी करण्यास मोर पिसारा फुलवितो. मादीस आकर्षित करण्यासाठी कोकीळ सुमुधुर गातो. जितका हा सूर अधिक टिकणारा व स्पष्ट तितका तो नर प्रजननासाठी सुयोग्य ठरतो. अशी माहिती दर्शन दुधाने यांनी दिली.
या कार्यक्रमात डाॅ. अनिल पेठे व डाॅ. भरत राठी यांनीही आपल्या भाषणात या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमात प्रारंभी संजय इंगळे तिगावकर यांनी बहारच्या वाटचालीतील महत्त्वाच्या टप्प्यांचा उल्लेख करीत या पक्षीसप्ताहात आयोजित नियमित पक्षीनिरीक्षण व जनजागृतीपर उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे संचालन स्नेहल कुबडे यांनी केले, तर आभार सहसचिव देवर्षी बोबडे यांनी मानले.
या कार्यक्रमापूर्वी सकाळी सालोड येथील तलावावर आयोजित पक्षीनिरीक्षण उपक्रमात लीला पूनावाला फाउंडेशनमधील शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थिनी तसेच सालोड येथील नेहरू विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या आयोजनात बहारचे कोषाध्यक्ष राजदीप राठोड, घनश्याम माहोरे, ॲड. पवन दरणे, याकुब शेख, निवास उरकुडे, वनरक्षक मनेशकुमार सज्जन, सुरज बोदिले, राकेश काळे, सुषमा सोनटक्के यांनी योगदान दिले.
