अमरावती : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत चांदूर बाजार तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरम येथील यात्रा गेल्या २० डिसेंबरपासून सुरू झाली. ही यात्रा आता अखेरच्या टप्प्यात असून महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ चालणारी ही यात्रा मानली जाते.
बहिरम येथे उंच टेकडीवर भैरवनाथाचे मंदीर आहे. येथे भैरवनाथाची मूर्ती आहे. ‘बहिरमबुवा’ हे सातपुड्याच्या कुशीत वसलेले लोकदैवत आहे. भैरवाचा अपभ्रंश होऊन कालांतराने ‘बहिरम’ नाव प्रचलित झाले. पुर्वी येथील यात्रा नागदिवाळीपासून सुरू होत असे. कालांतराने त्यात बदल होत गेले.
या यात्रेच्या स्वरूपात देखील काळानुरूप बदल झाला आहे. पूर्वी सरदार मंडळी आपापल्या शक्तीचे प्रदर्शन करीत होते. घोडे-सैनिकांसह राहुट्या टाकलेल्या असत. त्यानंतरच्या काळात गावोगावचे श्रीमंत, प्रतिष्ठित नागरिक राहुट्या, तंबू, डेरे टाकून येथे मुक्काम करीत असत. मोठय़ा जेवणावळी उठत. यात्रेचा हंगाम म्हणजे, शेतीच्या उत्पन्नाचे पैसे मिळणे सुरू होण्याचा काळ.
त्यामुळे या यात्रेत आर्थिक उलाढालही मोठया प्रमाणात होते. पूर्वी बैलगाडी, दमणी, छकडे, रेंगी, शेतीची विविध औजारे, बैलबाजार, दोर अशा शेतीशी संबंधित वस्तूंची मोठी विक्री होत असे. ठिकठिकाणच्या प्रसिद्ध तयार वस्तू विक्रीसाठी येत असत. मातीची भांडी, लाकूड, बांबूच्या वस्तूंची विक्री होई. करमणुकीसाठी दंढार भरत असे. त्यानंतर तमाशांचे फड रंगू लागले. लोकांदोलनानंतर तमाशे बंद झाले. आता बैलगाडा शर्यत (शंकरपट), कृषिविषयक कार्यक्रमांचे आयोजन होत असते.
फार पूर्वी बहिरम बुवांचा नवस म्हणून मंदिराच्या गाभाऱ्यात बकरे आणि कोंबड्यांचा बळी दिला जात होता. या बलिप्रथेमुळे रक्ताचे पाट वहायचे. संत गाडगेबाबा यांनी या अमानवी प्रथेविरोधात ठाम भूमिका घेत बहिरम यात्रेत बळी प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि मंदिर परिसरातील बळी प्रथा पूर्णतः बंद झाली. या बदलानंतर बहिरम बुवाच्या नैवेद्य व प्रसादाची संबंधित असलेले मटणाचे धार्मिक महत्त्व मंदिरापुरते कमी झाले.
मात्र यात्रेच्या बाहेरील परिसरात आजही मोठ्या प्रमाणात मातीच्या हंडीत शिजवलेल्या मटणाची परंपरा कायम आहे. यात्रेच्या स्वरूपात झालेला बदल केवळ खाद्य संस्कृतीपुरता मर्यादित नाही. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील या ठिकाणी हिंदी आणि मराठी भाषक लोकांमधील सांस्कृतिक संगम अनुभवायला मिळतो. गाणे, शेरोशायरी, आणि ठसकेबाज संवाद शैलीत लोकांचे मनोरंजन करणे, हेच आयुष्य मानणारे काही गायक, कलावंत बहिरम यात्रेत आपल्या कलेचे सादरीकरण करतात.

