वर्धा : बालभारती हे नाव महाराष्ट्रास सुपरिचित असे. शालेय पातळीवार पाठ्यपुस्तक निर्मितीचे काम ही संस्था अनेक वर्षांपासून करीत आली आहे. संस्थेने बहुविध उपक्रम राबवित शालेय मुलांचे ज्ञानवर्धन केले. आता या मंडळास वेध लागले ते एका महोत्सवाचे.

हीरक महोत्सव वर्ष

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारती. ही संस्था आपल्या स्थापनेचे ६० वे वर्ष साजरे करत आहे. २७ जानेवारी १९६७ रोजी स्थापन झालेल्या या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. या हीरक महोत्सवी वर्षाचे (२०२६-२०२७) औचित्य साधून बालभारतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एक महत्त्वपूर्ण व नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम हाती घेतला आहे.

‘हे’ दोन जिल्हे उपक्रम राबविणार

शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे पालकत्व स्वीकारित असलेला वर्धा हा एक जिल्हा. तर पालकमंत्री नसलेला व पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुंभमेळा पार्श्वभूमीवर पालकत्व असलेला नाशिक हा दुसरा जिल्हा. या दोन जिल्ह्यांमधील निवडक शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence ) या तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळा व ऑलिम्पियाड आयोजित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जगभरात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत वेगाने वाढत आहे. येत्या काळात दैनंदिन जीवन, शिक्षण आणि विविध व्यवसाय क्षेत्रांत AI चा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळणार आहे. यामुळे मानवी बुद्धिमत्तेचे आव्हान वाढणार असून, भविष्यातील व्यावसायिक संधींची ओळख विद्यार्थ्यांना शालेय वयातच व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

किशोरवयीन विद्यार्थी

या नवीन तंत्रज्ञानाची योग्य माहिती किशोरवयीन विद्यार्थ्यांना मिळाल्यास त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा. त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करता येईल, ही दुसरी बाब. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर या जिल्ह्यांमधील इयत्ता ६ वी ते इयत्ता १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी राबविला जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्याना प्रशिक्षण देण्यासाठी आणि ऑलिम्पियाड स्पर्धा आयोजित करण्यासाठी ‘M/s. Antargyan Cloudworks LLP, Pune’ या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.

१०० शाळांची निवड

या योजनेअंतर्गत वर्धा आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांतील प्रत्येकी १०० शाळांची निवड केली जाईल. निवडलेल्या शाळांमधील किमान ६० किंवा त्यापेक्षा जास्त इच्छुक विद्यार्थी व शिक्षकांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कार्यशाळेनंतर ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन केले जाईल. या स्पर्धेच्या मूल्यमापनात अव्वल स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना विशेष पारितोषिके देऊन गौरवले जाणार आहे. हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी नियुक्त केलेल्या संस्थेचे प्रतिनिधी शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करतील. त्यामुळे नाशिक व वर्धा येथील शिक्षणाधिकारी आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना आवश्यक ते सहकार्य व माहिती देण्याचे निर्देश द्यावेत, असे आवाहन बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मोफत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.