अमरावती: महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे देशातील मुलींची पहिली शाळा सुरू करून देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. परंतु, बालभारतीच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या (२०२६-२७) इयत्ता ३ री मधील ‘आपल्या सभोवतालचे जग भाग-२’ या पाठ्यपुस्तकात या शाळेचा उल्लेख ‘महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा’ असा संकुचित करण्यात आला होता. यासंदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. अखेरीस बालभारतीने ही चूक दुरूस्त केली आहे.
पाठ्यपुस्तक मंडळाने केली दुरूस्ती
इयत्ता तिसरीच्या आपल्या सभोवतालचे जग भाग २ पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्र. १५ वरील ‘माहीत आहे का तुम्हांला ?’ या चौकटीत ‘ही महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा होय.’ या वाक्याच्या ऐवजी ‘ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिली मुलींची शाळा होय. ही भारतीयांनी मुलींसाठी स्थापन केलेली पहिलीच शाळा होय.’ असा बदल करण्यात येत आहे. सदरचे शुद्धिपत्रक हे पाठ्यपुस्तक मंडळाच्या WWW.ebalbharati.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. अशी माहिती पाठ्यपुस्तक मंडळाच्या संचालक अनुराधा ओक यांनी दिली आहे.
शिक्षक संघटनेची मागणी काय होती?
या शाळेचा उल्लेख महाराष्ट्रापुरता मर्यादित करण्यात आल्याने बालभारतीची ही घोडचूक तातडीने दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी केली होती. दुसरीकडे, ही देशातील पहिली मुलींची शाळा आहे या बद्दल बालभारतीच्या संबंधित तज्ज्ञ अभ्यास मंडळाला काही शंका आहे काय? आणि म्हणून देशातील पहिली मुलींची शाळा किती साली, कोणी काढली हे मुलांना सांगायचे नाही का? असा सवाल मराठीच्या व्यापक हितासाठी या चळवळीचे प्रमुख संयोजक डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी निवेदनाद्वारे केला होता. ही शाळा फक्त महाराष्ट्रातील पहिली म्हणून आपण मुलांना सांगणार की देशातील पहिली मुलींची शाळा म्हणून, याबाबत कृपया खुलासा व्हावा आणि संबंधित चुकीची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी डॉ. जोशी यांनी केली होती.

जैन आणि बौद्ध धर्माविषयी माहिती हवी
सोबतच या पुस्तकातील ‘विविध धर्मांची शिकवण ‘ या पाठात, हिंदू, ज्यू, इस्लाम, पारशी यातील धर्मग्रंथ विद्यार्थ्यांना ठाऊक करून दिले गेले आहेत. मात्र तसे ते जैन आणि बौद्ध यांच्याबाबत का झाले नाही, अनवधानाने राहून गेले किंवा कसे याचा कृपया खुलासा व्हावा. हे दोन्ही धर्म भारतीय भूमीत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ते राहून जाणे ही चूकच आहे, असे डॉ. जोशी यांनी निवेदनात नमूद केले आहे.
