नागपूर : वन्यजीवांसाठी कर्दनकाळ ठरत असलेल्या बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गाने वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात आणला आहे. या रेल्वेमार्गाने आजतागायत शेकडो वन्यप्राण्यांचे बळी घेतले आहेत. रेल्वे आणि वन्यप्राणी समोरासमोर येणे हे नित्याचेच. कधी यात ते मृत्युमुखी पडले, तर कधी कायमचे अपंग झाले. सोमवारी पहाटेच्या सुमारास एक वाघीण तिच्या अधिवासातला हा रेल्वेमार्ग ओलांडत होती, पण शेवटी रेल्वेने तिला गाठलेच.

सूर्यास्त होत असताना जंगलातील वन्यप्राण्यांच्या हालचालीचा वेग वाढतो आणि सुर्याेदय होत असताना त्यांची जंगलातील हालचाल मंदावते. त्यामुळे जंगलालगतचे रेल्वेमार्ग, रस्ते, महामार्ग यावरुन होणाऱ्या वाहतूकीचा वेग हा या कालावधीत कमी असणे अपेक्षित असताना ते कधीच होत नाही. जंगलातून जाणाऱ्या आणि जंगलालगतच्या या रस्ते आणि रेल्वेमार्गांसाठी गतीमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. मात्र, त्याचेही पालन होत नाही. त्यामुळे आपल्याच अधिवासात वन्यप्राण्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते.

हेही वाचा – शिवसेना उद्धव ठाकरे गट देणार नागपूरकरांना रोजगार, ३९ कंपन्यांमध्ये…

बल्लारशा-गोंदिया रेल्वेमार्ग वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. तृणभक्षी प्राण्यांसह मांसभक्षी प्राण्यांचा सातत्याने या मार्गावर मृत्यू होत आहे. रेल्वेच्या धडकेत ठार होणाऱ्या वाघ आणि बिबट्यांची संख्याही वाढत आहे. त्यानंतरही याठिकाणी ‘मेटिगेशन मेजर्स’ कडे दुर्लक्ष केले जात आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास या मार्गावर तीन ते चार वर्षाच्या वाघिणीचा मृत्यू झाला. या रेल्वेमार्गावर वडसा व गोंदिया वनविभागाच्या सीमेजवळ वडसा वनविभागातील गांधीनगरजवळ कक्ष क्र. ९७ मध्ये रेल्वेरुळ ओलांडणाऱ्या वाघिणीला मालगाडीची जोरदार धडक बसली. या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळावर वडसा उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, गोंदिया उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई, वडसा वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे, मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर पोहोचले. त्यांनी घटनास्थळी पाहणी करुन वाघिणीचे शवविच्छेदन केले. त्याचठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. या रेल्वेमार्गावर सातत्याने वाघ, बिबट्यासह इतरही वन्यप्राण्यांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे या मार्गावर उपशमन योजना करण्यात याव्या, अशी मागणी वन्यजीव अभ्यासकांनी केली आहे.

हेही वाचा – आनंदवार्ता! नागपूर-मुंबई व नागपूर-पुणे विशेष रेल्वे गाड्या धावणार

अलीकडच्या काळात बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघ, अस्वल, बिबट्या, गौर, सांबर, चितळ, अजगर आदी शेकडो वन्यप्राणी मृत्युमुखी पडत आहेत. या रेल्वेमार्गावरुन भरधाव वेगाने मालगाडीसह इतरही रेल्वे धावतात. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाचा हा कॉरिडॉर आहे. मात्र, अजूनही रेल्वे आणि वनखात्याकडून या मार्गावर ‘मेटिगेशन मेजर्स’साठी आवश्यक त्या उपाययोजना गांभीर्याने घेतल्या जात नाहीत.