नागपूर : बल्लारशाह-गोंदिया रेल्वेमार्गावर वाघांच्या मृत्यूची मालिका थांबण्याचे नाव घेत नसतानाच बुधवारी मध्यरात्री आणखी एका वाघिणीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील लोंखैरी बीटमधील कक्ष क्रमांक २४७ मध्ये ही घटना घडली.

आतापर्यंत चा १९ वा वाघ

विशेष म्हणजे, या मार्गावरील हा आतापर्यंतचा १९वा वाघ मृत्यू असल्याने वन्यजीव संवर्धनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, २७ आणि २८ मेच्या मध्यरात्री ही वाघीण रेल्वेमार्ग ओलांडत असताना भरधाव रेल्वेगाडीची धडक बसली. घटनास्थळ सिंदेवाही परिक्षेत्रातील ब्रम्हपुरी वनविभागाच्या हद्दीत असून, वाघिणीचा मृत्यू जागीच झाला. घटनास्थळाचे जीपीएस स्थानांक N 20°11’59” आणि E 079°40’47” असे नोंदविण्यात आले आहेत.

वन्यजीव अभ्यासकांची भूमिका

दरम्यान, वन्यजीव कार्यकर्ते आणि ‘रोडकिल्स इंडिया’चे मिलिंद परिकवाम यांनी या घटनेनंतर रेल्वे प्रशासनावर तीव्र टीका केली आहे. “बल्लारशाह-गोंदिया रेल्वेमार्गावरील हा १९वा वाघ मृत्यू आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास वेळ लागणार असेल, तर पुढील पाच वर्षांत दरवर्षी किती वाघ मारले जाणार आहेत, हे रेल्वेने स्पष्टपणे जाहीर करावे. आणखी १९ वाघांचा बळी जाणार का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

यापूर्वी अनेक बळी

या रेल्वेमार्गावर यापूर्वीही अनेक वाघ, बिबट आणि अन्य वन्यप्राण्यांचे मृत्यू झाले आहेत. वन्यजीवांच्या स्थलांतर मार्गांवर वेगमर्यादा, सेन्सर प्रणाली, अंडरपास आणि सतर्कता यंत्रणा उभारण्याची मागणी वारंवार होत असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत विलंब होत असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे.