scorecardresearch

लोकशाहीच्या मुद्द्यावर ‘बामसेफ धडकणार संघ मुख्यालयावर’ ; ६ ऑक्टोबरला मोर्चाचे आयोजन

लोकांच्या बोलण्यावर बंदी घालणाऱ्या सरकारचे संचालन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे. त्याविरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे.

'bamsef will strike at the rss headquarters' on the issue of democracy
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

नागपूर : लोकशाही वाचवण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर येत्या ६ ऑक्टोबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. आधी बेझनबाग मैदानावर सभा होईल. त्यानंतर बामसेफ व भारत मुक्ती मोर्चातर्फे मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती बामसेफचे नेते प्रा. विलास खरात यांनी दिली. ते आज रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. हरियाणा येथे डीएनए परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेवर तेथील सरकारने बंदी घातली. त्यामुळे तो कार्यक्रम २७ तारखेला दिल्ली येथे घेण्यात आला. सामाजिक संघटनेच्या कार्यक्रमावर बंदी घालणे हा संविधानावर अतिक्रमण आहे.

लोकांच्या बोलण्यावर बंदी घालणे संविधानाचे उल्लंघन आहे. बंदी घालणाऱ्या सरकारचे संचालन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे. त्याविरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे. हा मोर्चा बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे.
दरम्यान, बुद्धिस्ट महाबोधी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भंते हर्षबोधी यांनी अभिनेता गगन मलिक हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हस्तक असल्याचा आरोप असून आयोजित केलेल्या बौद्ध संमेलनालाही त्यांनी विरोध केला आहे.

हेही वाचा : पतीकडे परतलेल्या प्रेयसीला गाडीने चिरडण्याचा प्रयत्न; प्रियकराला अटक

दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या संचालक मंडळात संघाचे निर्झर कुळकर्णी, आशिष द्विवेदी व के.पी. जोशी आहेत. ही मंडळी दीक्षाभूमीचे नियंत्रण करीत आहेत, असा आरोप प्रा. विलास खरात यांनी केला. धम्मचक्र दिनी दीक्षाभूमीवर भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम कार्यक्रम करणार आहेत. भाजपच्या अनुसूचित जातीच्या सेलच्या कार्यक्रमाला आमचा विरोध असल्याचेही खरात म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-09-2022 at 12:46 IST