यवतमाळ : बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यावरून पुसदमध्ये मोठा वाद पेटला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे कारण पुढे करून राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि त्यांच्या पत्नी पुसदच्या नगराध्यक्षा मोहिनी नाईक यांनी जयंती साजरी करण्यास नकार दिल्याचा आरोप बंजारा तरुणांनी केला आहे. १५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती होती.

आमच्या दैवताच्या जयंतीला दुखवटा आडवा येतो, मग इतर ठिकाणी जल्लोषात कसे सहभागी होता, असा संतप्त प्रश्न उपस्थित करत सकल बंजारा समाज नाईक कुटुंबियांच्या दुजाभावाविरोधात आता रस्त्यावर उतरला आहे. तीन दिवसांत जाहीर माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही समाजातील तरुणांनी दिला आहे.

यावर्षी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्याची तयारी समाजबांधवांनी केली होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जयंतीचा उत्सव साजरा करू नये, असा संदेश राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडून समाजबांधवांना पाठविण्यात आल्याचा आरोप आता होत आहे. यावर्षी संत सेवालाल महाराज जयंती शहरात साजरी होणार नसल्याचे समजताच बंजारा समाजाचे काही तरुण जाब विचारण्यासाठी नगराध्यक्षा मोहिनी नाईक यांच्याकडे गेले होते. त्यावेळी मोहिनी नाईक यांनी, ‘राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने आम्हाला दुःख झाले आहे. त्यामुळे आम्ही कोणताही उत्सव साजरा करणार नाही’, असे स्पष्टपणे सांगितल्याचा आरोप बंजारा समाजातील तरुणांनी केला आहे.

मात्र, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, नगराध्यक्ष मोहिनी नाईक या नेत्यांनी १४ फेब्रुवारीला पोहरादेवी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या संत सेवालाल महाराज जयंती उत्सवात हजेरी लावली आणि १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या जल्लोषातही ते सहभागी झाले. मग केवळ सेवालाल जयंतीलाच सुतक का, असा संतप्त सवाल आता समाजबांधव विचारत आहेत.

बंजारा समाजातील तरुण कार्यकर्ते आदित्य जाधव यांनी नाईक कुटुंबीयांच्या दुटप्पी भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, गेल्या ७० वर्षांपासून नाईक परिवार ज्या बंजारा समाजाच्या मतांवर निवडून येतो सत्तेची फळे चाखतो, त्याच समाजाला ते आज गृहीत धरत आहेत. अजितदादांच्या निधनाचे दुःख आम्हालाही आहे, पण म्हणून आराध्य दैवताची जयंती थांबवणे हा समाजाचा अपमान आहे. समाज आता कोणाच्या खुंट्याला बांधलेला नाही, हे नेत्यांनी लक्षात ठेवावे, असे आदित्य जाधव म्हणाले. या प्रकरणाने पुसदमधील राजकीय व सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नाईक कुटुंबियांच्या दुटप्पी वागण्याचा बंजारा समाजबांधवांकडून निषेध होत आहे.

जाहीर माफी मागावी

ज्या समाजाच्या जीवावर नाईक कुटुंबीय सत्ता भोगत आहेत, त्याच समाजाच्या भावना पायदळी तुडवणारे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांनी येत्या तीन दिवसांच्या आत बंजारा समाजाची जाहीर माफी मागावी. अन्यथा बंजारा समाज रस्त्यावर उतरून आपल्या अस्मितेसाठी लढा देईल, असा सज्जड दम बंजारा समाजातील तरुणांनी पोलीस आणि तहसील प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे. याप्रकरणी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.