नागपूर : महाराष्ट्र बँकेकडे दावा न केलेल्या ७८५ कोटी, ५२ लाख ९३ हजार, १२० रुपयांच्या ठेवी पडून असल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या इतर तपशीलानुसार, या बँकेने १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ दरम्यानच्या काळात ४ हजार क्रेडिट कार्ड ग्राहकांना दिले. बँकेने २०२३- २४ या आर्थिक वर्षात ६ लाख ६९ हजार ६९ ग्राहकांना ३ हजार ६५७.१० कोटींचे मुद्रा कर्ज दिले. त्यापैकी ३१ मार्च २०२४ रोजी ६३ हजार ४८० ग्राहकांनी ६८९.७४ कोटींची कर्जाची रक्कम थकवल्याचेही पुढे आले आहे. दावा न केलेली रक्कम बँकांना संबंधितांचा शोध घेऊन त्यांना परत करण्याचे भारतीय रिझर्व बँकेचे आदेश आहेत. परंतु, ही रक्कम परत केव्हा करणार, असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी केला आहे. बँकेची वर्षभरात ७०.६० कोटींनी फसवणूक महाराष्ट्र बँकेची २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण २९ प्रकरणात ७० कोटी ६० लाख रुपयांनी फसवणूक झाली. या काळात ७१ प्रकरणात सायबर गुन्हेगारांनी बँकेला २.१७ कोटी रुपयांनी फसवल्याचेही माहितीच्या अधिकारातून उघड झाले. हेही वाचा.‘मुन्ना भाई एमबीबीएस’ डॉक्टरांची ओळख पटविणे झाले सोपे; ‘क्यूआर कोड’ स्कॅन करा अन्… दावा न केलेल्या ठेवी म्हणजे काय? जर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ खात्यात व्यवहार झाले नाहीत तर खाते निष्क्रिय होते. म्हणज बँक खात्यात पैसे जमा केले नाहीत किंवा काढले नाहीत तर बँक या खात्याला 'नॉन परफॉर्मिंग अकाउंट' च्या यादीत टाकते. या नॉन परफॉर्मिंग अकाउंट मधील पैसे परत मिळवण्यासाठी, तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड ही महत्वाची कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतात. त्यानंतर तुमचं खातं पुन्हा सुरू होऊन तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. जर दहा वर्षांपर्यंत खात्यातून कोणतेही व्यवहार झाले नाही तर त्या खात्यातील रक्कम अनक्लेम डिपॉझिट (दावा न केलेल्या ठेवी) म्हणून गणली जाते. तुमच्या बँकेतील सेव्हींग खाते, फिक्स्ड डिपॉझिट, टर्म डिपॉझिट, रिकरंट डिपॉझिट यामध्ये जर कोणतेही व्यवहार झाले नाहीत तर याला दावा नसलेल्या ठेवी समजल्या जातात. अशा ठेवींचे तपशील, खात्यांची संख्या, त्यातील रक्कम आदी तपशील बँका आर्थिक वर्षाच्या अखेरीस रिझर्व्ह बँकेला सादर करतात. त्यानंतर, या सर्व ठेवी डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेरनेस फंडात वळवल्या जातात. हेही वाचा.भाच्याच्या सुखी संसारात ‘शकुनी’ मामीने संशयाचे विष पेरले, पण भरोसा सेलने… खाती निष्क्रिय का होतात? खाती निष्क्रिय होण्याची आणि दावा न सांगितलेल्या ठेवी तशाच पडून राहण्याची अनेक कारणे असू शकतात. बँक खात्यांबद्दल योग्य जागरूकता नसणे, खातेदाराचे निधन होणे, कुटुंबातील सदस्यांना खात्याच्या तपशीलांची माहिती नसणे किंवा दावा करण्यासाठी कोणीही व्यक्ती ह्यात नसणे आदी कारणांमुळे खाती तशीच पडून राहतात. बऱ्याचदा होतं असं की, कुटुंब प्रमुख कुटुंबातील सदस्यांना आपल्या बँक खात्याविषयी काहीच माहिती देत नाहीत. कधी कधी तर पतीच्या बँक खात्याची माहिती पत्नी किंवा मुलांनाही नसते. खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या फिक्स्ड डिपॉझिटची पावती घरात सापडू शकते. यावरून कुटुंबातील सदस्यांना त्या खात्याविषयी माहिती मिळण्याची शक्यता जास्त असते. बँकेत येणारी बहुतांश प्रकरणे ही अशीच आहेत. पण खेड्यापाड्यातील लोकांना बँक खात्यांबाबत पुरेशी माहिती नसते. आणि त्यामुळे ती खाती निष्क्रिय होतात, ठेवी ही तशाच पडून राहतात."