नागपूर : तीन दिवसांचा देशव्यापी बँक संप ऐनवेळी स्थगित करण्यात आल्याने बँक कर्मचारी आणि अधिकारी वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, प्रस्तावित संपाच्या आधी रविवारी, २७ सप्टेंबरला बँका सुरू ठेवण्यात आल्या आणि अनेक कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी काम केले. मात्र, त्याच रात्री साडेनऊच्या सुमारास इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (युएफबीयू) यांच्यात झालेल्या बैठकीनंतर २८ ते ३० सप्टेंबरचा संप स्थगित करण्यात आला. रविवार काम केल्यावर युनियने अशाप्रकारे निर्णय घेतल्यावर बँक कर्मचाऱ्यांनी आता याप्रकरणी स्वत:च पुढाकार घेत मोठा निर्णय घेतला आहे.
८ लाख कर्मचारी-अधिकारी संपात सहभागी होणार होते
या संपात युएफबीयूशी संबंधित विविध कर्मचारी आणि अधिकारी संघटनांचे सुमारे ८ लाख सदस्य सहभागी होणार होते. सात प्रमुख बँक कर्मचारी व अधिकारी संघटनांचा युएफबीयूमध्ये समावेश आहे. त्यामुळे प्रस्तावित संपाचा बँकिंग व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. देशभरातील सुमारे १.८१ लाख बँक शाखांवर त्याचा परिणाम होऊ शकला असता.
रविवारी काम, रात्री निर्णय
सलग सुट्ट्या आणि त्यानंतर प्रस्तावित संपामुळे ग्राहकांना बँकिंग सेवांपासून दीर्घकाळ दूर राहावे लागू नये, यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका २७ सप्टेंबरला सुरू ठेवण्यात आल्या. आरबीआयनेही शाखा, कार्यालये, एटीएमशी संबंधित शाखा आणि करन्सी चेस्ट सुरू ठेवण्यास मंजुरी दिली होती. कर्मचाऱ्यांनी रविवारी काम केल्यानंतर काही तासांतच संप स्थगित झाल्याने निर्णयाच्या वेळेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. ‘संपाचा निर्णय आधीच घेण्यात आला असताना रविवारी काम करण्याचा निर्णय का घेण्यात आला?’ तसेच ‘रविवारी केलेल्या कामाचे काय?’ असे प्रश्न कर्मचारी उपस्थित करीत आहेत.
पाच दिवसाचा आठवडा करण्याची मागणी
संप स्थगित करण्यात आला असला तरी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या कायम आहेत. बँकिंग क्षेत्रात पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करून उर्वरित शनिवार सुट्टीचे दिवस घोषित करण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली होती. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठीच्या परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेटिव्ह (पीएलआय) योजनेवरही संघटनांचा आक्षेप होता. दरम्यान, सरकारने ही योजना तूर्तास स्थगित केली आहे.
सदस्यत्व मागे घेण्याचा निर्णय
संप स्थगित करण्याच्या निर्णयामुळे काही कर्मचाऱ्यांमध्ये युनियन नेतृत्वाविरोधात नाराजी असल्याची चर्चा आहे. सोमवारी हजारो कर्मचाऱ्यांनी युनियनचे सदस्यत्व मागे घेतल्याची माहितीही समोर येत आहे. युनियन निरुपयोगी झाली असल्याची भावना अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. उल्लेखनीय आहे की युनियने सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांकडून एक निश्चित रक्कम घेतली जाती. दरमहा ही रक्कम घेऊनही बँक कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय युनियनकडून होत नसल्यामुळे कर्मचारी संतप्त आहेत. मात्र, सदस्यत्व किती कर्मचाऱ्यांनी मागे घेतले किंवा किती जणांनी तसे करण्याचा निर्णय घेतला, याची अधिकृत आकडेवारी अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे हा आकडा निश्चितपणे सांगणे घाईचे ठरेल.
