नागपूर : उपमुख्यमंत्रिपदावर असताना बारामती येथे झालेल्या विमान अपघातात ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या विधानसभा मतदारसंघांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 4 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा सूर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी लावला होता. शुक्रवारी महायुती सरकारमधील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही कॉंग्रेस नेत्यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी मोठे मन करावे, असे आवाहन केले आहे.
काँग्रेस पक्षाने बारामतीसोबतच राहुरी या विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. येथून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहे. याबाबत नागपुरात प्रसारमाध्यमासोबत बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अजित पवार यांचे सर्वांसोबत चांगले संबंध होते. कॉंग्रेसच्या लोकांचेही ते काम करीत होते. कॉंग्रेसने अजित पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले. कॉंग्रेसच्या नेत्यांनी ही बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली. यापूर्वी सुप्रिया सुळे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. बावनकुळे यांनी अजित पवार यांचे ७५ टक्के राजकारण कॉंग्रेसच्या लोकांसह मिळून केले. त्यामुळे कॉंग्रेसने ही निवडणूक बिनविरोध करावी, राहुरीमध्ये मात्र त्यांनी उमेदवार द्यावा, तो त्यांचा अधिकार आहे, असे सांगितले.
कॉंग्रेससह रासप व वंचितच्या नेत्यांनाही त्यांनी बिनविरोध निवडणुकीचे आवाहन केले. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी त्या राज्यसभेच्या खासदारपदी विराजमान होत्या. मात्र उपमुख्यमंत्रिपद भूषवताना राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्यत्व घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्या अजित दादांच्या बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून येत्या ६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर व तालुक्यात बैठकांना सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गावागावात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी रणनीती आखली जात आहे.
खरात प्रकरणात कायद्यानुसार कारवाई
नागपुरातील लेखिका अरुणा सबाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भोंदूगिरीच्या आहारी गेलेल्या महिलाही या प्रकरणात जबाबदार असून त्यांच्यावरही कारवाईची मागणी केली आहे. यावर बावनकुळे म्हणाले, अशोक खरातने या महिलांना प्रलोभन दाखवून फसवले. आपल्या देशात प्रलोभन दाखवून व अनुचित प्रकार करणे याविरोधात कायदा आहे, कायद्याने कारवाई होईल.
