नागपूर : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करत निवडणूक रंगतदार करण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसकडून अॅड. आकाश मोरे आज, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बिनविरोध निवडणुकीबाबत चर्चा सुरू असताना काँग्रेसने मात्र ‘एफआयआर नोंदवा, मगच बिनविरोध’ ही अट पुढे केली आहे.
प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी बिनविरोध निवडणुकीसंदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली. परंपरेनुसार बिनविरोध निवडणुकीला काँग्रेसचा विरोध नसला तरी त्यासाठी काही अटी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अजितदादांच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्रात, विशेषतः बारामतीत एफआयआर नोंदविणे गरजेचे आहे. ही मागणी पूर्ण झाल्यानंतरच बिनविरोध निवडणुकीबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
भाजपावर ‘सोयीच्या राजकारणा’चा आरोप
लोंढे यांनी भाजपवर टीका करताना पूर्वीच्या घटनांचा दाखला दिला. नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर तसेच मंगळवेढ्यात भालके यांच्या मृत्यूनंतर निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी भाजपने वेगळा पवित्रा घेतला होता. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत भाजपने सोयीचे राजकारण करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
चौकशीच्या मागणीकडे दुर्लक्ष?
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी चौकशीची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही सीबीआय चौकशीची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. मात्र या मागणीवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, असे लोंढे म्हणाले.
रोहित पवारांच्या प्रयत्नांचा उल्लेख
एफआयआर नोंदवण्यासाठी रोहित पवार यांनी प्रयत्न केल्याचेही लोंढे यांनी सांगितले. महाराष्ट्रात यश न मिळाल्याने कर्नाटकात प्रयत्न करावे लागले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. “हीच का संवेदनशीलता?” असा सवाल उपस्थित करत काँग्रेसने पुन्हा एकदा महाराष्ट्रात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. ही अट पूर्ण झाल्याशिवाय पुढील भूमिका ठरवली जाणार नसल्याचे लोंढे यांनी स्पष्ट केले.
