नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व व मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड करताना २८ ऑगस्टला सामाईक परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, जाहिरातीमध्ये उल्लेख नसताना या सामाईक परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ४०० रुपये शुल्क घेतले जात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत ‘बार्टी’ने हे शुल्क परत करण्याचा निर्णय घेतला.
अनुसूचित जातीच्या ३०० उमेदवारांना ‘बार्टी’कडून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व व मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी निवडले जाते. यासाठी २७ ऑगस्टला सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. यंदा ही परीक्षा राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई यांच्यामार्फत घेतली जाणार आहे. इतर काही संस्थांसह ‘बार्टी’ची सामाईक परीक्षाही त्यांच्याकडूनच घेतली जाणार आहे.‘बार्टी’ने सामाईक परीक्षेच्या अर्जासाठी काढलेल्या जाहिरातीमध्ये शुल्क आकारण्याचा उल्लेख नाही. असे असतानाही ४०० रुपये शुल्क भरावे लागत आहे. विशेष म्हणजे, याआधी ‘बार्टी’ने घेतलेल्या सामाईक परीक्षेमध्ये असे शुल्क नव्हते. ‘महाज्योती’ व ‘सारथी’ या संस्थांकडूनही यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी सामाईक परीक्षा घेण्यात आली. मात्र, शुल्क आकारण्यात आले नाही.




महाज्योतीने खासगी कंपनीकडून २७ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. या तुलनेत ‘बार्टी’ची विद्यार्थी संख्या कमी आहे. असे असतानाही आर्थिक दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ सामाईक परीक्षेसाठी ४०० रुपये शुल्क आकारले जात आहे. याला विरोध करण्यात आला होता.
‘बार्टी’कडून सामाईक परीक्षेसाठी जे शुल्क घेण्यात आले ते परत करण्याचा निर्णय झाला आहे. – सुनील वारे, महासंचालक, बार्टी