देवेश गोंडाणे

नागपूर: सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थामार्फत (बार्टी) दिल्ली येथे अनुसूचित जातीतील निवडक २०० विद्यार्थ्यांना ‘युपीएससी’ परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत विशेष प्रशिक्षण दिले जाते. मात्र, मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे चांगली योजना दुर्लक्षित झाल्याचे  वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्याची दखल घेतली. त्यांनी ‘युपीएससी’च्या प्रशिक्षणार्थींची संख्या १०० ने वाढवून ३०० केली.

 राज्य सरकारकडून २००८ मध्ये स्वायत्तता मिळालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये (बार्टी) हल्ली राज्य सरकारचा अवाजवी हस्तक्षेप वाढल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला होता.  त्यामुळेच ‘बार्टी’ची प्रशिक्षण कार्यक्रमाची तयारी असतानाही मंत्रालयाने हा निर्णय अडवून ठेवल्याची माहिती होती. याची दखल अखेर मंत्र्यांनी घेतली. ‘बार्टी’च्या वतीने दरवर्षी अनुसूचित जातीच्या दोनशे विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी राज्यभरातील विद्यार्थी अर्ज करत असून प्रवेश परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिल्ली येथील दर्जेदार शिकवणीकडून प्रशिक्षण दिले जाते. यापुढे आता तीनशे विद्यार्थ्यांची या प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. तसेच दिल्ली येथे नामांकित प्रशिक्षण केंद्रात प्रवेश तसेच सदर उमेदवारांना निवास व भोजन व्यवस्था  ‘बार्टी’मार्फत केली जाईल. प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी असे आवाहन महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.