scorecardresearch

‘बार्टी’चे विद्यार्थी ‘अधिछात्रवृत्ती’पासून वंचित

अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने मासिक अधिछात्रवृत्ती दिली जाते.

मुलाखत देऊनही वर्षभरापासून प्रक्रिया अपूर्ण

नागपूर: अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने मासिक अधिछात्रवृत्ती दिली जाते. मात्र, ५१८ विद्यार्थ्यांनी वर्षभराआधी अधिछात्रवृत्तीसाठी मुलाखती देऊनही अद्यापही त्यांची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने विद्यार्थी अधिछात्रवृत्तीच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे २०१९ व २०२० मधील संशोधकांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पत्र लिहून कागदपत्रांच्या पडताळणीच्या आधारे सरसकट अधिछात्रवृत्ती देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

अनुसूचित जातींमधील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी डॉ. बााबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती देण्यात येते. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येते. यासाठी परीक्षा घेण्यात येते. त्यानुसार त्यामुळे ५२८ परीक्षार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. तर ५१८ परीक्षार्थीनी पुणे येथे मुलाखत दिली होती. मात्र त्यानंतरही अधिछात्रवृत्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही. गेल्या वर्षभरापासून हे विद्यार्थी अधिछात्रवृत्तीची वाट पाहत आहेत. काही विद्यार्थ्यांचे संशोधन पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तर काही विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्यांचे संशोधन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. या संशोधक विद्यार्थ्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे याना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांना दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून अधिछात्रवृत्ती देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. एम.फिल. आणि पीएच.डी. संशोधन हे अतिशय खर्चिक आणि वेळ लावणारे आहे. करोनामुळे त्यांच्यामध्ये नैराश्य येण्याची भीती आहे, असे विद्यार्थी नेते अतुल खोब्रागडे यांनी सांगितले.

लवकरच पात्र संशोधकांची यादी जाहीर करण्यात येईल. जास्तीत जास्त संशोधकांना याचा लाभ मिळेल, असे प्रयत्न बार्टीकडून करण्यात येत आहे. काटेकार नियमांचे पालन केले जात आहे. त्यामुळे यादी घोषित करण्यात उशीर झाला असे म्हणता येणार नाही. 

– धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Barty students deprived scholarship ysh

ताज्या बातम्या