नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपूर्ण प्रवासात ज्या वेळी ओबीसींना न्याय देण्याचा विषय आला त्या वेळी त्यांच्या नेत्यांनी विरोधात काम केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व त्या पक्षाचे नेते हेच खरे ओबीसींचे शत्रू आहेत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. भाजपाने कधीही ओबीसीवर अन्याय केला नाही, असेही ते म्हणाले.
नागपूर येथे ते पत्रकारांशी संवाद साधत होते, ते म्हणाले, निवडणुका जवळ आल्याने राष्ट्रवादीला ओबीसी समाजाची आठवण आली. भाजपाने मोदी यांना पंतप्रधान करून ओबीसी समाजाला न्याय दिला. केंद्रात ओबीसी समाजाचे २७ मंत्री आहेत. महाराष्ट्रात फडणवीस यांच्या काळातच ओबीसींचे मंत्रालय स्थापन झाले. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात समाजाला न्याय मिळू शकत नाही या कारणावरून तत्कालीन ओबीसी आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडे यांना राजीनामा द्यावा लागला होता.
ओबीसी समाजाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आता ढोंग करत आहे. भाजपवर खोटे आरोप करत आहेत, असा आरोप बावनकुळे यांनी केला. ओबीसींची जनगणना करण्याची तरतूद संविधानात नाही, बिहार सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने असे करता येणार नाही असा निर्णय दिला. त्यासाठी संविधानात सुधारणा करावी लागणार आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.