बुलढाणा : बीड जिल्ह्याच्या माजलगांव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे काल बुधवारी घडलेल्या भीषण बोट दुर्घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील दोन भाविक महिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच वाशीम जिल्ह्यातील एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. यामुळे लोणार तालुक्यात शोककळा पसरली असून अधिक मासाच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

कशी झाली दुर्घटना?

हिंदू धर्मात अधिक मासाचे मोठे महत्व आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या यां अधिक मासात भाविक तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करतात. मराठवाड्यातील पुरुषोत्तमनगरी येथे अधिक मास निमित्त यात्रा भरते. त्यामुळे यां गावात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. यावेळी पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची बोट गोदावरी पात्रात बुडाल्याची दुर्घटना घडली.दहा लोकांची क्षमता असताना पन्नास एक लोक बोटीत बसवून ती गोदावरी पात्रातून नेली जात होती, असा आरोप होत आहे. अनेक महिला बोटीतून उतरत होत्या. परंतु बोट चालकाने उतरू दिले नाही. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवल्याने गोदावरी पात्रात काही अंतरावर जाताच बोट बुडाली.

बचाव मोहीम

बोट बुडाल्याची दिसताच उपस्थित भाविक , नागरीक आणि बचाव पथकाने तात्काळ गोदावरीत उड्या घेत लोकांना वाचवले. बचाव कार्य राबवत लोकांना गोदावरी नदीतून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या दुर्दैवी घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी येथील रहिवासी असलेल्या दोन भाविक महिलांचा मृत्यू झाला. प्रमिला शेषराव राठोड( वय ५५ वर्षे, राहणार बीबी, तालुका लोणार ), कांता ज्ञानोबा आंधळे ( वय ६०, राहणार बीबी ) अशी मृत महिलांची नावे आहे. या घटनेमुळे बिबी गावावर शोककळा पसरली आहे. सिंधू अर्जुन मावळे मावळे (वय ७५, रा. महागाव, जिल्हा वाशिम) या पाण्यात बुडाल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.