बीजोत्सव गटाचे मत, ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट

नागपूर : पोषण हा घटक आजच्या शेतीतून नाहीसा झाला आहे. मोठय़ा बाजारपेठांनी निवडीचे स्वातंत्र्य हिरावले आहे. जनुकीय सुधारित बियाणे बाजारात आले आहे, पण या सर्व गोष्टी मानवी आरोग्यावर परिणाम करत आहे. शेतीतून नाहीसा झालेला पोषण घटक परत आणण्यासाठी, निवडीचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि स्थानिक बियाण्यांना कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी बीजोत्सवाची गरज आहे, अशी भूमिका नागपूर बीजोत्सव गटाचे विनय फुटाणे, आकाश नवघरे, प्राची माहूरकर यांनी मांडली.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

बीजोत्सवाच्या पूर्वसंध्येला ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष भेटीत त्यांनी बीजोत्सव आयोजनामागील भूमिका कथन केली. सेंद्रिय शेती, बीज संवर्धन व शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये विचारांची देवाण-घेवाण व्हावी, या हेतूने २०१३ मध्ये बीजोत्सवाची सुरुवात झाली. त्यावेळी केवळ चार जिल्ह्यातील शेतकरी यात सहभागी होते. त्यावेळी अमरावती मार्गावरील विनोबा विचार केंद्रात आयोजित बीजोत्सव आता म्यूर मेमोरियल रुग्णालयाच्या परिसरात येऊन ठेपला आहे. जिल्हास्तरावरचा हा प्रवास आता राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. करोनामुळे मागील दोन वर्षे तो आयोजित करता आला नाही. पण आता पुन्हा त्याच उत्साहाने बीजोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांत बीजोत्सवाचा आवाका शाश्वत जीवनशैली, सुरक्षित अन्न चळवळ, बचत गटांचे प्रशिक्षण, अशा विविध क्षेत्रात वाढत चालला आहे. बीजोत्सवाच्या माध्यमातून उत्पादन-विक्री साखळीतील शोषण कमी करण्याच्या उद्देशाने ग्राहक ते शेतकरी असा थेट संबंध यातून जोडला जातो. देशी बियाण्यांची व शेतीतील अनुभवांची देवाण-घेवाण, केंद्रीय मालाची विक्री आणि प्रदर्शन, पर्यावरणपूरक उत्पादनांचे प्रदर्शन, अशा वेगवेगळय़ा उपक्रमाच्या माध्यमातून शाश्वत जीवनशैली कशी अंगीकारता येईल, यासाठी बीजोत्सवाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी बीजोत्सवाला नक्की भेट द्यावी आणि शेतकऱ्यांची भूमिका समजून घ्यावी. तसेच सेंद्रिय उत्पादनाचा अंगीकार करावा, असे आवाहन नागपूर बीजोत्सव गटाने केले.

बियाणे हा महत्त्वाचा बिंदू आहे. आज गावरान बियाणे उपलब्धच नाही. शेतकऱ्यांना बियाण्यांचे आदानप्रदान करता यावे, यासाठी बीजोत्सव हा महत्त्वाचा मंच आहे. करडई, सूर्यफुल, भूईमुगासह जैवविविधता नष्ट होते की काय, अशी भीती आहे. यासाठीच शेतकऱ्यांमध्ये बियाण्यांचे आदानप्रदान आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे बाजारावरचे अवलंबित्व कसे कमी करता येईल, यादृष्टीनेही तो महत्त्वाचा ठरणार आहे.

विनय फुटाणे, नागपूर बीजोत्सव गट

स्थानिक बियाणे वातावरणातील बदल सहन करतात. ही बियाणे टिकवून ठेवायची आहेत. पुढील संशोधनासाठीदेखील हीच बियाणे लागणार आहेत. जनुकीय सुधारित बियाणे बाजारात आली आहेत, पण ती मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहेत. त्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी देखील बीजोत्सव महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.

प्राची माहूरकर, नागपूर बीजोत्सव गट

निसर्ग माणसाला एकत्र राहायला शिकवतो, पण माणूस निसर्गाच्या विरोधात जात आहे. प्रक्रिया केलेले बियाणे शेतकऱ्यांसाठी देखील घातक ठरत आहेत. मुळात शेती, शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असताना या घटकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेती आणि शेतकरी यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बीजोत्सव महत्त्वाचा आहे.

आकाश नवघरे, नागपूर बीजोत्सव गट

८ ते १० एप्रिलदरम्यान आयोजन

म्यूर मेमोरियल रुग्णालयाच्या सौजन्याने रुग्णालय परिसरात आठ ते दहा एप्रिलदरम्यान बीजोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कापूस ते कापड हा विषय आणि याबद्दल प्रदर्शन तसेच मेजवानी हे बीजोत्सवाचे मुख्य आकर्षण असेल. खात्रीलायक सेंद्रिय साहित्य वापरून तयार केलेले विविध पारंपरिक खाद्यपदार्थ निरनिराळय़ा चवीचा आनंदही बीजोत्सवादरम्यान घेता येईल.