नागपूर : भरदुपारी घरात शिरून चाकूचा धाक दाखवत ६२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावल्या प्रकरणात जमावाने चोराला शोधून काढत चोप दिला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार करताच पोलिसांनी मेडिकलमध्ये आणले. तोच डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे निदान केले. त्यामुळे बेलतरोडी परिसरात एकच खळबळ उडाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सुमेध गजभिये (२८) असे जमावाने केलेल्या जबर मारहाणीत दगावलेल्या चोराचे नाव आहे. दिपक पाटील नावाचा त्याचा दुसरा साथीदार सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नेमकं काय घडलं बेलतरोडीत….?
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बेलतरोडी येथील डीपी रोडवर मॉडेल मिल नावाने निवासी संकूल आहे. या परिसरात धार्मिक नावाच्या कुटुंबात दोन महिला घरी होत्या. त्यावेळी सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास सुमेध आणि त्याचा साथिदार दिपक हे दोघे डिलिव्हरी बॅाय असल्याचे सांगत घरात घुसले. या दोघांनी घरातील महिलेला चाकूचा धाक दाखवत तिच्या गळ्यातील दिड तोळ्याचे मंगळसुत्र हिसकावत पळ काढला. दरम्यान महिलेने तातडीने याची माहिती मुलांना दिली. मुलांनी परिसरात शोध घेत एका संशयिताला पकडले.
काॅलनीत आणत जबर मारहाण….?
त्यांनी सुमेधला पकडून पुन्हा कॉलनीत आणले. मुलांनी त्याला आईसमोर दाखवत तो हाच होता का असे विचारले. त्यावर आईने चाकूच्या धाकावर मंगळसूत्र हिसकावणारा हाच होता, असे सांगताच संतप्त नागरिकांना त्याला चांगलाच चोप देणे सुरू केले. दरम्यान परिसरात तणाव पाहता कोणीतरी बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली. बीट मार्शल घटनास्थळी पोहतच त्याला ठाण्यात आणले. रक्त बंबाळ अवस्थेत पोलीस त्याची चौकशी करत असतानाच सुमेधने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. पोलिसांनी त्याला तडक मेडिकलमध्ये नेले. तिथे अपघात विभागात डॉक्टर तपासत असतानाच त्याचा मृत्यू झाला. जमावाने केलेल्या मारहाणीत चोराचा मृत्यू झाल्याची बातमी शहरात परताच झुंडबळीच्या घटनेने तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान मृत सुमेध गजभिये याच्यावर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
